‘ओजस’ शाळेत २५ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:01 AM2018-05-12T01:01:21+5:302018-05-12T01:01:21+5:30
विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शासकीय शाळांना आता चांगले दिवस येऊ लागले. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभागाच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेत ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा सत्र २०१८-१९ पासून सुरूवात करण्यात येत आहे. २५ विद्यार्थ्यांना नर्सरी ते केजी-२ चे शिक्षण दिले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याच्या पहिल्या टप्यात १३ शाळांची ओजस म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातून मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. एक ओजस शाळेच्या अंतर्गत नऊ तेजस आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्यात येणार आहे. परंतु या तेजस शाळा संदर्भात विचार करण्यात आला नाही. राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला आहे.
शाळा लोकसहभागावर चालणार
ओजस आंतरराष्ट्रीय शाळेची सुरूवात यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून होत आहे. शासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम राहील. ही शाळा लोकसहभागावर चालणार आहे. या शाळेसाठी राज्यस्तरीय संस्थेकडून चाचणी परीक्षेद्वारे गुणवंत शिक्षकांची निवड केली जाणार आहे. बालकांच्या सर्वांगीण बौद्धीक, शारीरिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आनंददायी कृतीतून मिळणार शिक्षण
शासनमान्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण, प्रशस्त वर्गखोल्या, मोठी पटांगणे, खेळणी साहित्य, तज्ञ महिला शिक्षिका,डिजीटल शिक्षण, वाहतूक व्यवस्था व आनंददायी कृतीतून शिक्षण दिले जाणार आहे.
शाळांत भौतिक, शैक्षणिक व मूलभूत सोयी आंतरराष्ट्रीय ओजस शाळेत मिळतील. गोंदिया जिल्ह्यात ओजस शाळा निर्मीतीमुळे शासकीय शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. त्यासाठी पालकांनी शाळेत नाव दाखल करावे.
- उल्हास नरड, प्राथमिक शिक्षणाधिकारी गोंदिया