चार विधानसभा क्षेत्रासाठी २६२ उमेदवारी अर्जांची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:00 AM2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:38+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सोमवारपर्यंत या चारही मतदारसंघातून एकूण २६२ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली. तर आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून राजकीय घडमोंडीना वेग आला आहे.युती आणि आघाडीने अद्यापही उमेदवार जाहीर केले नाही. त्यामुळे एकाही राजकीय पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी ४५ जणांनी १०१ अर्जाची उचल केली आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी २३ अर्जाची उचल करण्यात आली आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी १०४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. त्यात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३४ अर्जाची उचल करण्यात आली आहे. चारही विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारपर्यंत एकूण २६२ अर्जाची उचल करण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्जांची उचल करणाऱ्यावर नजर टाकली असता सर्वाधिक अर्जांची उचल अर्जुनी मोरगाव मतदारसंघात तर सर्वात कमी अर्जांची उचल तिरोडा मतदारसंघातून करण्यात आली आहे.
शेवटच्या दोन दिवसात होणार गर्दी
युती आणि आघाडीतर्फे जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.बहुतेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी ३ किंवा ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सुध्दा सज्ज झाले आहे.
आता उत्सुकता केवळ उमेदवारांची
युती आणि आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांच्या याद्या तयार केल्या आहेत. निवडणुकी दरम्यान पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना उमेदवारी जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा उमेदवार कोण याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.
दिग्गज उमेदवार भरणार शेवटच्या दिवशी अर्ज
विधानसभा निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे अधिकृत उमेदवार शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या तिन्ही पक्षांकडून नियोजन केले जात असल्याचे चित्र आहे.