२.७० लाख पुस्तकांत बालके दंग
By admin | Published: April 2, 2017 01:03 AM2017-04-02T01:03:44+5:302017-04-02T01:03:44+5:30
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांत वाचन कट्टा तयार केला.
नरेश रहिले गोंदिया
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांत वाचन कट्टा तयार केला. अनेक वेळा वाचन दिवस, अक्षर सुधार कार्यक्रम राबविले. दप्तरविरहीत दिन पाळला गेला. जिल्ह्यातील बालकांसाठी पाठ्यक्रमाव्यतिरिक्त विविध संस्कारक्षम आणि वाचनिय अशी २ लाख ७० हजार २५९ पुस्तके गेल्या वर्षभरात उपलब्ध झाली आहेत. ती पुस्तके वाचण्यात ग्रामीण भागातील बालके रमल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी यासाठी अडीच लाख विद्यार्थ्यांसाठी ८ सप्टेंबर व १५ आॅक्टोबर या दोन दिवशी वाचन आनंद दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात दप्तरविरहीत दिन वाचन आनंद दिन म्हणून सर्व शाळांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ रोजी साजरा करण्यात आला. २ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी २६ लाख पुस्तकांचे वाचन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० पुस्तके वाचली. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना चित्ररूप गोष्टी हाताळण्यासाठी देण्यात आली. वाचन झालेल्या पुस्तकांवर शिक्षकांनी संवाद साधला. संगणक युगातही पुस्तक वाचण्याची सवय विद्यार्थ्यांना असावी यासाठी द्विभाषी बाल पुस्तके जिल्ह्यांना उपलब्ध करवून देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १०६९ शाळांमध्ये पाठ्यक्रमाव्यतिरिक्त वाचनिय अशी २ लाख ७० हजार २५९ पुस्तके उपलब्ध आहेत.
शाळेच्या मधल्या सुटीत किंवा वेळ मिळेल त्यावेळी ती पुस्तके विद्यार्थी वाचत असतात. अनेक पुस्तके विद्यार्थी घरीही घेऊन जातात. वाचन आनंद दिनामुळे संगणक युगातील विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे वळली आहेत.
प्रेरणादायी कथा, चरित्र्यवान, महापुरूषांचे चरित्र व अनेक पुस्तके आहेत. वाचन संस्कृतीकडे विद्यार्थी वळावे यासाठी शासनाने पुढाकार घेऊन प्रत्येक शाळेत वाचनालय तयार करावे अशी अपेक्षा पालकांकडून केली जात आहे.
मराठीसोबत इंग्रजीचे वाचन
एकाच पुस्तकावर आधी मराठीत लिहीलेले वाक्य त्याखाली इंग्रजीत भाषांतर करून आहेत. अशी द्विभाषिक पुस्तके गोंदिया जिल्ह्यातील ४३६ शाळांत पुरविण्यासाठी ४० लाख ८२ हजार ९८ रूपये अनुदान देण्यात आले. केंद्र सरकारने ‘पढे भारत, बढे भारत’ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४३६ शाळांना द्विभाषी पुस्तकांसाठी प्रत्येक शाळेला ९ हजार ३६३ रूपये दिले. विद्या प्राधीकरण पुणे यांनी प्रकाशित केलेली द्विभाषी पुस्तके खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.