२७५ पर्यटकांनी केली जंगल सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:00 AM2020-11-04T05:00:00+5:302020-11-04T05:00:12+5:30
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत आहे. यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे.
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील ८ महिन्यापांसून बंद असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अखेर रविवारपासून (दि.१) पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. यामुळे पहिल्याच दिवशी सोमवारी तब्बल २७५ पर्यटकांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगलसफारी केली. यातून वन विभागाला ४९ हजार ५५० रूपयांचा महसूल मिळाला आहे.
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत आहे. यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे.
जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते.
मात्र आता अनलॉक अंतर्गत सोमवारपासून (दि.१) प्रकल्पाला पर्यटनासाठी खुले करण्याची परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी तब्बल २७३ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगलसफारी केली.
१० वर्षाखालील १० मुलांचा समावेश
व्याघ्र प्रकल्पाला परवानगी दिली जात असतानाच १० वर्षांखालील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्यात बदल करून १० वर्षांखालील मुलांच्या प्रवेशास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, सोमवारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या २७५ पर्यटकांमध्ये १० वर्षाखालील १० मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. यावरून लहान मुलांनाही वन पर्यटनाची ओढ दिसून येत असून शासनाचा हा निर्णय लहान मुलांसाठी फायद्याचाच ठरल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
चोरखमारा गेटलाच पसंती
व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुले होताच सोमवारी २७३ पर्यटकांनी भेट दिली असून यासाठी ६४ वाहनांनी प्रकल्पात प्रवेश केला आहे. यात, सर्वाधिक १९ वाहनांनी चोरखमारा गेटने प्रवेश केला असून ८३ पर्यटकांचा त्यात समावेश आहे. यामुळे या गेटवरून १५ हजार २०० रूपयांचा महसूलही वन विभागाला मिळाला. हे बघता, चोरखमारा गेटलाच पर्यटक जास्त पसंती दाखवित असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.