जिल्ह्यात अडीच वर्षांत २७६३ गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:35 PM2017-12-15T23:35:00+5:302017-12-15T23:35:31+5:30
जिल्ह्यात मागील अडीच वर्षात २७६३ अधिकृत गर्भपात करण्यात आले. विशेष म्हणजे गर्भपात करणाऱ्यांमध्ये अविवाहीत १११ तरुणींचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील अडीच वर्षात २७६३ अधिकृत गर्भपात करण्यात आले. विशेष म्हणजे गर्भपात करणाऱ्यांमध्ये अविवाहीत १११ तरुणींचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ही सर्व अधिकृत केंद्रावरील आकडेवारी असून वास्तविक आकडे यापेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्त्री भ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. मात्र यानंतरही मुलींचा घटता जन्मदर चिंतेचा विषय ठरत आहे. मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव न करता दोघांनी समान वागणूक तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी व्यापक स्तरावर जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहे. मात्र यानंतरही स्त्री भ्रूण हत्येला पूर्णपणे प्रतिबंध लागला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ती काहीशी खरी देखील असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये १२२५, २०१६-१७ मध्ये ८०९ आणि नोव्हेबर २०१७ पर्यंत ७२९ गर्भपात करण्यात आल्याची नोंद अधिकृत गर्भपात केंद्रामध्ये झाली आहे. जिल्ह्यात अधिकृत गर्भपात केंद्राची संख्या केवळ ६३५ आहे. यापेक्षा अधिक अनधिकृत गर्भपात केंद्राची संख्या असून गर्भपात करण्यासाठी ३० ते ३५ हजार रुपयांचा दर असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील काही मोजक्याच खासगी रुग्णालयात अधिकृत गर्भपात केंद्रांची नोंद आहे. या रुग्णालयात केल्या जाणाºया गर्भपातांची अधिकृत नोंद व माहिती आरोग्य विभागाला सादर केली जाते. मात्र बहुतेक खासगी रुग्णालयात मोठी रक्कम घेवून गर्भपात करुन दिले जातात त्याची कुठलीही नोंद केली जात नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
या परिसराची चर्चा
जिल्ह्यातील काही भागात अनधिकृत गर्भपात केंद्र सुरू आहेत. यात गोंदिया तालुक्यातील काटी, सडक-अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील पाच ते सहा गावांची नावे सध्या चर्चेत आहेत. मात्र मागील दीड वर्षांत एकाही अनधिकृत गर्भपात केंद्रावर कारवाई करण्यात आली नाही.
आमच्या यंत्रणेकडे खात्रीलायक माहिती असल्याशिवाय कारवाई करता येत नाही. अधिकृत गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी केली जाते.
- डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया