लाईनमनला बसला २:७८ लाखाचां शॉक; अधिक पैसे मिळविण्याच्या नाद
By नरेश रहिले | Published: September 24, 2023 12:53 PM2023-09-24T12:53:51+5:302023-09-24T12:57:02+5:30
सहकारी लाईनमेनचेच गंडविले
गोंदिया : कमी वेळेत अधिक पैसे कमविण्याच्या आमिषात गेलेल्या लाईनमनला दुसऱ्या लाईनमनने तब्बल दोन लाख ७८ हजार २०० रूपयांनी फसवणूक करून जोरदार झटका दिला. त्या लाईनमन विरूध्द डुग्गीपार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लाईनमन म्हणून काम करणारे राकेश अशोक साखरे (४५, रा. सौंदड)) हे अधिक पैसे कमाविण्याच्या नादात सहकारी लाईनमेन आरोपी योगेश हेमराज बिजेवार (३५, रा. मुर्दाळा-गोंदिया) यांच्या सोबत सल्ला मसलत करीत होते. यातूनच न्युझीलँड येथील टी अँड जी या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास अधिक पैसे मिळतात याचे प्रलोभन आरोपी योगेश बिजेवार याने लाईनमन राकेश साखरे यांना दिले. योगेश बिजेवारच्या शब्दावर कायम राहून राकेश साखरे याने त्याला दोन लाख ७८ हजार २०० रुपये दिले. त्यानंतर तीन लाख रुपये यूपीआय द्वारे गुंतवणूक करण्यास लावले. असे एकूण पाच लाख ७८ हजार २०० रुपयांची त्यांनी गुंतवणूक केली. त्यापैकी तीन लाख रुपये राकेश साखरे यांना परत मिळाले. परंतु १२ जून २०२३ रोजी गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी दोन लाख ७८ हजार २०० रुपये १४ जुलैपर्यंत परत मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच २३ सप्टेंबर रोजी त्यांनी डुग्गीपार पोलिसात तक्रार केली. राकेश साखरे यांच्या तक्रारीवरून आरोपी योगेश बिजेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत.