२८ लाखांच्या स्टील कचराकुंड्या कचऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:09+5:30
केंद्र सरकारची सध्या स्वच्छतेवर बारीक नजर असून स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र अंमलात आणून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यांतर्गत आपले शहर असो वा गाव स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात असून त्यासाठी रँकींगही दिले जात आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात नानाविध प्रयोग केले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील क चरा इकडे-तिकडे न फेकता कचराकुंडीत जमा केला जावा यासाठी नगर परिषदेने मागील वर्षी शहरात ठिकठिकाणी स्टील ड्रमपासून बनविलेल्या कचराकुंड्या लावल्या. मात्र आजघडीला यातील कित्येक कचराकुंड्या खुद्द कचºयात दिसून येत आहे. सुमारे २०० कचराकुंड्या शहरात बसविण्यात आल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारची सध्या स्वच्छतेवर बारीक नजर असून स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र अंमलात आणून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यांतर्गत आपले शहर असो वा गाव स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात असून त्यासाठी रँकींगही दिले जात आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात नानाविध प्रयोग केले जात आहेत. यातच मागील वर्षी कचरा रस्त्यांच्या काठावर किंवा नाल्यांमध्ये टाकला जाऊ नये यासाठी स्टील ड्रमपासून तयार करण्यात आलेल्या कचराकुंड्या शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आल्या. ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यासाठी या कचराकुंडयांत दोन ड्रम वापरण्यात आले आहेत.
सुमारे १४ हजार रूपयांची एक कचराकुंडी असून अशा सुमारे २०० कचराकुंड्या शहरात बसविण्यात आल्या. नगर परिषदेने एका उदात्त हेतूने या कचराकुंड्या बसविल्या त्यात काहीच शंका नाही. मात्र या कचराकुंड्या बसविण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या कचराकुंड्यांची दुर्गत झाली आहे. कित्येक कचराकुंड्या लावलेल्या ठिकाणावरून गायब झाल्या असून कित्येकांची तोडफोड करण्यात आली आहे. तर कित्येक कचराकुंड्या आजघडीला खुद्द कचऱ्यात पडून असल्याचे दिसत आहे.
सुमारे २८ लाख रूपये या कचराकुंड्यांवर खर्च करण्यात आले असून हा पैसा मात्र नाहक खर्च झाल्यासारखे हे चित्र बघून वाटत आहे.
सिमेटच्या कुंड्या बिनकामाच्या
नगर परिषदेने २ वर्षांपूर्वी ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिमेंटच्या कचराकुं ड्या बनविल्या होत्या. मात्र त्यातील कित्येक कुंड्यांची मोडतोड झाली आहे. शिवाय सिमेंट पाईपचाही कचराकुंड्याच्या स्वरूपात वापर करण्यात आला. मात्र त्यांचीही तोडफोड झालेली दिसते. तर कित्येक कुंड्या असूनही त्यांचा उपयोग होताना दिसत नाही. यामुळे नगर परिषद नवनवीन प्रयोग करीत असून त्यांचे प्रयोग फेल ठरत असल्याचे दिसत आहे.