२९ कृषी केंद्रांना बियाणे विकण्यास बंदी
By admin | Published: June 28, 2016 01:27 AM2016-06-28T01:27:30+5:302016-06-28T01:27:30+5:30
खरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री
नरेश रहिले ल्ल गोंदिया
खरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री नियमानुसार व्हावी यासाठी कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची तपासणी सुरू आहे. जिल्हाभरातील २१८ कृषी केंद्रावर अचानक धाड घालून तपासणी केली असता जिल्ह्यातील २९ कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तृट्या पूर्ण करण्यासाठी २१ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.
कृषी केंद्रांकडे साठा पुस्तक नसणे, दरफलक न लावणे, विक्री परवान्यात विक्री करीत असलेल्या कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश नसणे अशा विविध कारणांसाठी गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, गोरेगाव आणि आमगाव या तालुक्यातील २९ केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील ५८९ क्विंटल धानाचे बियाणे विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामासाठी ४४ हजार ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी ७० टक्के बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांंनी दिली. २९ कृषी केंद्राना बियाणे विक्री बंदचे आदेश देण्यात आले असून येत्या २१ दिवसात त्रुट्याची पूर्तता करा. अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तृट्या पूर्ण करणाऱ्या कृषी केंद्रांना बियाणे विक्री करण्यास मूभा दिली जाणार आहे.
अधिकृत केंद्रातूनच खरेदी करा
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्री परवाना असणाऱ्या कृषी केंद्रांमधूनच बियाण्यांची खरेदी करावी. यासंदर्भात काही गडबड आढळल्यास कृषी विभाग गोंदियाकडे (०७१८२-२५०३९५, ९४२२८३१४३४, ९४२२८३४७१६) संपर्क करावा. कृषी केंद्रांनी नियमानुसार आपल्या दुकानात दरपत्रक लावावे, साठा रजिस्टर ठेवावे आणि विक्री परवान्यातील कंपन्यांची नावे नमूद करावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मोहीम अधिकारी अनूप शुक्ला यांनी सांगितले.
३० हजार मेट्रीक टन खत उपलब्ध
जिल्ह्यातील धान पिकासाठी दरवर्षी ४२ ते ४४ हजार मेट्रीक टन खताची आवश्यकता असते. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० हजार मेट्रीक टन पर्यंत खताचा साठा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार साठा पुरेपूर असल्याचे सांगण्यात आले.
आठ कृषी केंद्राना कारणे दाखवा नोटीस
तृट्या आढळलेल्या कृषी केंद्र संचालकांना जिल्हा भरारी पथकाने कारणे दाखवा नोटीस बजावले आहेत. त्यात मेंढे कृषी केंद्र ठाणा, श्रीनाथ कृषी केंद्र ठाणा, श्री कृषी केंद्र साखरीटोला, राज कृषी केंद्र हरदोली, चाहत कृषी केंद्र कवडी, चिखलोंडे कृषी केंद्र नागरा, वैनगंगा कृषी केंद्र मुंडीकोटा, पांडव सहकारी संस्था नवेझरी यांचा समावेश आहे.
कारवाईसाठी ९ पथके
बोगस बियाणे किंवा खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक व जिल्ह्याच्या ठिकाणी एक असे ९ पथक तयार करण्यात आले आहे. परराज्यातील बियाणांवर बंदी आहे. महाराष्ट्रात महागुजरात, अंकुर सिड्स, बायर्स, न्युजीविडू, वसंत अॅग्रोटॅक, निर्मल सिड्स असे ३५ कंपन्याचे विविध प्रकारचे वाण जिल्ह्यात विक्री केले जातात.
- शेतकऱ्यांना आवाहन
४शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा (बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके) खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातून मान्यता प्राप्त कंपनीचे व वाणाचे बियाणे घ्यावे, बियाणे खरेदी करतांना बॅगवर टॅग लावलेले आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, बियाणांच्या बॅगवर सिंगल टॅग म्हणजे सत्यदर्शक व डबल टॅग म्हणजे प्रमाणित बियाणे असे असते, बियाणांचे बॅगवर लावलेल्या छापील टॅगवर लॉट नंबर, अंतिम वापर दिनांक व इतर माहिती नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, खरेदी केलेल्या कृषि निविष्ठाचे पक्के बिल घ्यावे, बिलामध्ये लॉट नंबर, बॅच नंबर, प्रति नग किंमत नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे, बियाणांच्या पिशवीसह टॅग व पक्के बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे, कृषि निविष्ठाच्या बॅग, कन्टेनरवर छापील किंमत पेक्षा जास्त देऊ नये.