२९ लाख क्विंटल धानाची अद्यापही उचल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:27 AM2021-03-24T04:27:09+5:302021-03-24T04:27:09+5:30
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत एकूण ८० धान खरेदी केंद्रावरुन २९ लाख ४७ हजार क्विंटल धान खरेदी केली ...
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत एकूण ८० धान खरेदी केंद्रावरुन २९ लाख ४७ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेला धान काही प्रमाणात धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्या झाकून ठेवण्यात आला आहे. तर काही धान गोदामात आहे. मात्र जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने याचा धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला फटका बसत आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा धानाला १८८८ व १८५८ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता. तसेच राज्य सरकारने धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला. त्यामुळे धानाला प्रति क्विंटल २५०० रुपये क्विंटल भाव मिळत होता. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक झाली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत २९ लाख ४७ हजार ७१९ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानापैकी आतापर्यंत राईस मिलर्सने केवळ ३५ हजार क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे २९ लाख क्विंटल धानाची अद्यापही उचल होणे बाकी असून हा धान खरेदी केंद्रावर ताडपत्र्या झाकून पडला. त्यातच अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत असल्याने या धानाला फटका बसून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
......
दीडशे कोटी रुपयांचे चुकारे थकले
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत एकूण २९ लाख ४७ हजार ७१९ क्विंटल धान खरेदी केला. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ५५० कोटी ६३ लाख ३९ हजार ९१३ रुपये असून यापैकी ४०७ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले. तर जवळपास दीडशे कोटी रुपयांचे चुकारे होणे शिल्लक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १ लाख १२ हजार ७०८ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे.
....
राईस मिलर्सची नाराजी कायम
राईस मिलर्सने अद्यापही धानाची उचल केली नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. धानाची उतारी बरोबर येत नाही, तसेच तांदळाचा गुणवत्ता सुध्दा चांगली नसल्याने, शिवाय भरडाई आणि वाहतुकीचे भाडेसुध्दा शासनाकडून वेळेवर मिळत नाही त्यामुळे राईस मिलर्स शासकीय धानाची भरडाई करण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी अद्यापही धानाची उचल केली नसल्याची माहिती आहे.
.......
धान खरेदीला मुदतवाढीचा निर्णय नाही
शासकीय धान खरेदीची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यातच बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. त्यामुळे धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला अद्यापही यासंदर्भात कुठलेच आदेश प्राप्त झाले नाही.