९० क्विंटल तांदळाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 10:21 PM2019-07-27T22:21:39+5:302019-07-27T22:22:28+5:30
तालुक्यातील आंबेतलाव येथे बुधवारी (दि.२४) नेवालाल पटले यांच्या घरात पोषण आहार पुरवठा योजनेचा अवैध १८० कट्टे (प्रती कट्टा ५० किलो) तांदळाचा साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्यानंतर गोरेगाव पोलीस, तहसीलदार यांच्यासह आंबेतलाव येथे रात्री १० वाजता धाड टाकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील आंबेतलाव येथे बुधवारी (दि.२४) नेवालाल पटले यांच्या घरात पोषण आहार पुरवठा योजनेचा अवैध १८० कट्टे (प्रती कट्टा ५० किलो) तांदळाचा साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्यानंतर गोरेगाव पोलीस, तहसीलदार यांच्यासह आंबेतलाव येथे रात्री १० वाजता धाड टाकली.नेवालाल पटले यांच्या घरात १८० कट्टे तांदळाचा अवैध साठा आढळला. तहसीलदार शेखर पुनसे यांनी पंचासमक्ष पंचनामा करुन गुरुवारी वजन करुन तांदूळ जप्त केला. सदर तांदूळ प्रशासकीय गोदाम गोरेगाव येथे ठेवण्यात आला.
तहसीलदार पुनसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेतलाव येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांच्या पथकाने नेवालाल पटले यांच्या घरी धाड टाकली. यात अवैध तांदळाचे १८० कट्टे अंदाजे ९० क्विंटल तांदूळ आढळला.
या संदर्भात नेवालाल पटले यांना विचारपूस केली असता मोहाडी या गावचा विलास बघेले यांनी हा तांदूळ आणून ठेवला असल्याचे पोलिसांना सांगितले. हा तांदूळ पोत्यावरील अंकित मार्कानुसार शासकीय असावा, असा तर्क लावून याची माहिती तहसीदलार पुनसे यांना दिली.
तहसीलदार पुनसे यांनी या धान्याची शहानिशा करुन पंचनामा केला व गुरुवारी धान्याच्या वजनाचा काटा करुन शासकीय गोदामात १८० कट्टे ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. विलास बघेले हा इसम गोरेगाव तालुक्यातील मोहाडी या गावचा रहिवासी आहे. आमगाव तालुक्यात पोषण आहार पुरवठाधारकाजवळ काम करीत असून शाळेत पोषण आहार पुरवठा करीत असतो. तसेच या कट्टयावर असलेले मार्क श्री अशोका राईस ट्रेडर्स हिंद एफ.जी.एस. (पी.बी.) लिहिले आहे. त्यामुळे हे धान्य अवैध असल्याचे बोलले जाते. गोरेगाव तहसीलदार शेखर पुनसे यांनी लवकरच मोहाडी निवासी विलेश बघेले यांना बोलावून या संदर्भात माहिती घेवून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शेखर पुनसे यांनी सांगितले.