जिल्ह्यासाठी ठरले आतापर्यंत ३ ‘गोल्डन डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:47+5:302021-07-14T04:33:47+5:30
कपिल केकत गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने कहर सुरू केला व त्याचे दुष्टचक्र अद्यापही सुरूच आहेत. दररोज ...
कपिल केकत
गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने कहर सुरू केला व त्याचे दुष्टचक्र अद्यापही सुरूच आहेत. दररोज निघणाऱ्या नव्या दिवशी कोरोनामुळे काही ना काही अप्रिय घटनाच पुढे येत असल्याचा सर्वांचाच अनुभव आहे. मात्र, एढ्यातही जिल्हावासीयांना ३ सुखद धक्के मिळाले आहेत. त्यात २८ जानेवारी, ४ जुलै व त्यानंतर आता १३ जुलैला जिल्ह्यात शून्यबाधिताची नोंद घेण्यात आली असून हे ३ दिवस जिल्ह्यासाठी ‘गोल्डन डे’ ठरले आहेत.
कोरोनाचा कहर जिल्ह्यात जरी नियंत्रणात असला तरी आजही काही जिल्हे व राज्यांमध्ये त्याचा तांडव सुरूच आहे. यामुळे आजही कोरोनामुळे दररोज काही ना काही अप्रिय घटना कानी पडतच आहेत. कोरोनाच्या या ग्रहणामुळे आज सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली असून त्यांना या भीतीतच एक-एक दिवस मोजत घालवावा लागत आहे. दुसऱ्या लाटेची भीती कमी होत नाही तोच आता तिसऱ्या लाटेच्या बतावण्या सुरू झाल्या आहेत.
या भीती वाढविणाऱ्या घटनांसोबतच मात्र जिल्हावासीयांना काही सुखद घटनांचे धक्केही बसत आहेत ही दिलासादायक बाब आहे. त्याचे असे की, मागील वर्षी कोरोनाने कहर केल्यानंतर दररोज बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच २८ जानेवारीला जिल्ह्यात शून्यबाधितांची नोंद घेण्यात आली व पहिला सुखद धक्का जिल्हावासीयांना बसला. त्यानंतर आता ४ जुलैला हीच गूड न्यूज जिल्हावासीयांना मिळाली असतानाच मंगळवारी (दि.१४) जिल्ह्यात तिसऱ्यांदा शून्यबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्ह्यासाठी हे ३ दिवस ‘गोल्डन डे’ ठरले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
-------------------------------
जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर
सुदैवाने जिल्ह्यात मंगळवारी फक्त १४ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात शून्य बाधितांची नोंद घेण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढली नसून उलट ६ बाधितांची सुटी झाल्याने क्रियाशील रुग्णसंख्या घटली आहे. त्यात तिरोडा तालुका कोरोनामुक्त असून उर्वरित अन्य तालुक्यांत आता २-३ रुग्ण उरले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहे.
-------------------------
तिसऱी लाट थोपविण्यासाठी नियम पाळा
जिल्हावासीयांच्या संयमामुळे जिल्ह्यातून दुसरी लाट ओसरली असून आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. जिल्हावासीयांना प्रशासनाला दिलेल्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात असल्याने आपल्या जिल्ह्याला या ग्रहणापासून वाचविण्यासाठी जिल्हावासीयांना आताही नियमांचे पालन करण्याची गरज आहे.