३३ टक्के शेतकऱ्यांनाच शेतकरी सन्मानचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:49 PM2019-07-22T22:49:17+5:302019-07-22T22:49:32+5:30
विजय मानकर। लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सुरु केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ आतापर्यंत तालुक्यातील ...
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सुरु केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ आतापर्यंत तालुक्यातील केवळ ३३ टक्केच शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नाही ते अद्यापही तहसील कार्यालयाची पायपीट करीत असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाठी ६ हजार मानधन देण्याची घोषणा केली होती. यापैकी दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मार्च अथवा एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा देखील करण्यात आला. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरात लवकर जमा करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला युध्द पातळीवर कामाला लावण्यात आले.
यानंतरही तालुक्यात आतापर्यंत केवळ ३३ टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. तालुक्यात एकूण शेतकऱ्यांची संख्या जवळपास २३ हजार असून त्यापैकी आतापर्यंत ७ हजार ६४० शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला. शेतकरी सन्मान योजना सुरु झाली याला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटला. त्यामुळे दुसऱ्या हप्त्याची रक्कम सुध्दा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षीत होते.मात्र ती केवळ १५ टक्के शेतकऱ्यांनाच मिळाली आहे.एकूण २३ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ३ हजार ५६८ शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली.
चार हजार शेतकरी अपात्र?
तालुक्यातील एकूण २३ हजार शेतकऱ्यांपैकी काही खातेदार ह्यात नसून काही कायमचे बाहेरगावी राहत असलेले शेतकरी,शासकीय नोकरी करणारे पेंशनधारक व पदाधिकारी इत्यादी शेतकरी अपात्र ठरत असून अशा शेतकऱ्यांची संख्या जवळपास चार हजारावर आहे.त्यांना वगळता तालुक्यात जवळपास १९ हजार शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळू शकतो.
वेळकाढृू धोरणाचा परिणाम
शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करुन शासनाकडे पाठविणाºया यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे वेळेत यादी केंद्र सरकारकडे पोहचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकºयांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास विलंब होत आहे.शेतकºयांची यादी आवश्यक माहितीसह तयार करुन महसूल विभागाच्या संबधीत विभागाकडे देण्याची जवाबदारी तलाठी कार्यालय,ग्रामपंचायत आणि कृषी विभागाकडे सोपविली होती. मात्र या विभागाकडे इतरही कामे असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे.
सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करुन पाठविण्यात आल्या आहेत.लवकरच प्रत्येक पात्र लाभार्थ्याना योजनेचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रथम टप्याचे दोन हजार मिळाले त्यांच्या खात्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्याची ठराविक कालावधी जमा केली जाईल.
- सी.जी.पित्तुलवार, तहसीलदार, सालेकसा.