३० हजार मतदारांनी केला नोटाचा वापर

By admin | Published: July 10, 2015 01:47 AM2015-07-10T01:47:49+5:302015-07-10T01:47:49+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० जून रोजी मतदान झाले.

30 thousand voters used the note | ३० हजार मतदारांनी केला नोटाचा वापर

३० हजार मतदारांनी केला नोटाचा वापर

Next

गोंदिया : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० जून रोजी मतदान झाले. निवडणूक निकालाची प्रतीक्षा ६ जुलै रोजी पूर्ण झाली. संपूर्ण जिल्हा परिषद व पंचायत समितीत कोण निवडणूक जिंकेल, हे या दिवशी स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत ३० हजार मतदारांनी कोणताही उमेदवार पसंत नसल्याच्या नोटा बटनाचा वापर केला आहे.
मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थापैकी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन संस्था ग्रामीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन्ही निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात असल्यामुळे राजकारणात या निवडणुकींना महत्त्व आहे. सत्ता काबीज करण्यासाठी मतदार राजाला साखळे घालून मतांचा जोगवा मागितला जातो.
जगातील सर्वात मोठी आदर्श लोकशाही असलेल्या आपल्या देशात मतदार हा राजा आहे. कुणाला मतदान करावे किंवा निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांना नाकारायचा अधिकारदेखील मतदारांना नोटाच्या या नकाराधिकाराच्या माध्यमातून मिळाला आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ व पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये जिल्ह्यातील ५३ जिल्हा परिषद विभागासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत १५ हजार ०९३ मतदारांनी उभे असलेले राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारांपैकी कुणालाही मतदान करायचे नाही, यासाठी मतदान यंत्रावरील वरील पैकी कुणीही नाही अर्थात नोटाचे बटन दाबून आपले मत दिले. तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीतसुध्दा १५ हजार १६३ मतदारांनी वरिलपैकी कुणीही नाही अर्थात नोटाचे बटन दाबून मतदान केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अपक्षांनी बरीच मते घेतली. जिल्हा परिषदेमध्ये ३४ हजार ६२ मते आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ३४ हजार ५८ मते अपक्षांनी घेऊन काही ठिकाणी पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करण्यास अपक्षांनी घेतलेले मतदान कारणीभूत ठरले. गोंदिया आणि गोरेगाव पंचायत समितीत प्रत्येकी एक अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोरेगाव तालुक्यातील केवळ घोटी जिल्हा परिषद गटातून उभ्या राहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला १२७ मते मिळाली. तर गोंदिया तालुक्यातील नागरा पंचायत समितीच्या गणातून कॅम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्सवादी) या पक्षाच्या उमेदवाराला ६१ मते, इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षाकडून निवडणूक लढलेल्या उमेदवाराला गोंदिया तालुक्यातील काटी पंचायत समिती गणातून १५७ व दासगाव खुर्द या पंचायत समिती गणातून ५४ मते मिळाली.
राज्य निवडणूक आयोगाकडून नोंदणी केलेल्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला गोंदिया तालुक्यातील नवेगाव या गणातून १४८ मते, घिवारी गणातून २२२ मते व कटंगीकला गणातून १५६ मते मिळाली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 30 thousand voters used the note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.