डिसेंबरपर्यंत ३००० वीज कनेक्शन

By admin | Published: August 19, 2015 01:56 AM2015-08-19T01:56:24+5:302015-08-19T01:56:24+5:30

पाच वर्षात विजेच्या समस्या संपुष्टात आणणार$$्निेगोंदिया : जिल्ह्यातील ३००० शेतकऱ्यांना मोटरपंपासाठी लागणारे कनेक्शन ...

3000 power connections till December | डिसेंबरपर्यंत ३००० वीज कनेक्शन

डिसेंबरपर्यंत ३००० वीज कनेक्शन

Next

ऊर्जामंत्र्यांची ग्वाही : पाच वर्षात विजेच्या समस्या संपुष्टात आणणार$$्निेगोंदिया : जिल्ह्यातील ३००० शेतकऱ्यांना मोटरपंपासाठी लागणारे कनेक्शन (जोडण्या) येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत दिल्या जाणार असून उर्वरित शेतकऱ्यांना मार्च २०१६ पर्यंत वीज कनेक्शन दिले जाईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी गोंदियात दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विजेच्या समस्यांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, खा.नाना पटोले, आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे आदींसह महावितरणचे सर्व अधिकारीगण आणि विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
सकाळी १० वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी २ वाजतापर्यंत चालली. यावेळी गोंदिया शहापासून तर गावोगावच्या वीजविषयक समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. ना.बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अनेक बाबतीत तातडीने निर्णय दिले तर अनेक समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सांगितलेल्या काळात समस्या मार्गी न लागल्यास आपल्या मोबाईलवर थेट ‘एसएमएस’ टाका, असा सल्लाही त्यांनी समस्या मांडणाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही दिला.
या आढावा बैठकीनंतर ना.बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आढावा बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. गोंदिया शहरासह जिल्ह्यातील आकस्मिक भारनियमनाची समस्या, वीज चोरी व गळतीची समस्या याबाबत पत्रकारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची उदासीनता त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
बैठकीनंतर हिवरा येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या ५ एमबी अतिरिक्त रोहित्राचे उद्घाटन ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यात पुढील पाच वर्षात २५० ते ३०० कोटी रुपये निधी खर्च करून विजेच्या विविध समस्या सोडविण्यात येतील. बेरोजगार असलेल्या विद्युत अभियंत्यांना कामे उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. वीज ग्राहकांना व उद्योगांना चांगली वीज देऊन मेक इन महाराष्ट्रातून अनेक उद्योग सुरू होतील. याशिवाय शेतकऱ्यांना वीज देणे गरजेचे आहे. वीजेतून सिंचन निर्माण झाल्यास शेतकरी समृद्ध होईल. वीज वितरण ही ग्राहकांना चांगली सेवा देणारी कंपनी म्हणून भविष्यात नावारूपास येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना पालकमंत्री बडोले म्हणाले, रोहित्राच्या लोकार्पणामुळे या भागातील वीज समस्या काही बाबतीत सोडविण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांना चांगली वीज मिळाली तर भरघोस उत्पन्न घेऊन समृद्धी साधता येईल. खा.पटोले म्हणाले, वीज ही मुलभूत गरज झाली आहे. चांगले ऊर्जेचे स्त्रोत निर्माण करून चांगली वीज सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वीज वितरणचा गोंदिया शहर व ग्रामीणचा आराखडा तयार करण्यात आल्यामुळे वीजेबाबतच्या समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याचे यावेळी आ.गोपालदास अग्रवाल म्हणाले.
प्रास्ताविकातून महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांनी या हिवऱ्यातील रोहित्रामुळे १४ गावांना चांगला वीज पुरवठा करण्यास मदत होईल असे सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता यु.बी.शहारे, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) आर.आर.जनबंधू, गोंदियाचे अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
केटीएसमधील मृत्यूप्रकरणी
तीन अभियंते निलंबित
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात वीज पुरवठा खंडित झाल्याने दवनीवाडा येथील नुतन राजेश लोणारे या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. हा मुद्दा आढावा बैठकीत काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी उचलल्यानंतर शाखा अभियंता सुमित पांडे यांच्या निलंबनाची घोषणा उर्जामंत्र्यांनी केली. त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जात नाही. त्यावर कारवाई होत नसल्याचे विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर सहायक कार्यकारी अभियंता धामनकर व उपकार्यकारी अभियंता नावेद शेख यांना निलंबित करून त्यांच्या चौकशीचे आदेश उर्जामंत्र्यांनी दिले.
भूमिगत विद्युतीकरणासाठी
७२ कोटींची योजना

गोंदिया शहरातील भूमिगत विद्युतीकरणाची योजना ऊर्जामंत्र्यांनी मंजूर केली. त्यासाठी ७२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तूर्त १० किलोमीटर भूमिगत विद्युत लाईनसाठी १८ कोटी रुपये मंजूर करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा भाजपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

Web Title: 3000 power connections till December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.