घरकुल लाभार्थ्याची ३० हजार रुपयांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 08:53 PM2019-03-28T20:53:02+5:302019-03-28T20:54:04+5:30
गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : गंधारी येथील बिरजो पडोटी या वृध्द आदिवासी महिलेला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने घर बांधून देतो असे आश्वासन देऊन ३० हजार रुपयांनी फसवणूक केली. तीन चार वर्ष लोटूनही बिरजो यांना घरकुल न मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या आदिवासी बहुल व दुर्गम तालुक्यातील गंधारी हे गाव. या गावात आदिवासी समाजबांधवांची संख्या अधिक आहे. मात्र येथील गरजवंताना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. घरोघरी शौचालय बांधण्यात आले. मात्र एकाही घराच्या शौचालयाच्या खड्यावर झाकण नाही. त्यामुळे दुर्गंधी व रोगराईला आमंत्रण देत आहे. स्वातंत्र्यांच्या ७२ वर्षानंतरही आजही गंधारी येथील आदिवासी समाजबांधव घरकुलाच्या मुलभूत सुविधेपासून वंचित आहे. तर दुसरीकडे निर्मलग्राम, स्वच्छ गाव या योजनेचा फज्जा उडालेला गंधारी गावात पाहावयास मिळाला.
कुंपणच शेत खात असेल तर तक्रार कुणाकडे करावी अशा विवंचनेत गंधारीचे आदिवासी समाजबांधव पडले आहे. गाढवी नदीच्या कुशीत असलेल्या गंधारी गावाची लोकसंख्या ५१२ एवढी आहे. गावात ११७ घरे आहेत. गट ग्रामपंचायत बोंडगाव सुरबनमध्ये या गावाचा समावेश आहे. या गावात सर्वात जास्त आदिवासी बांधव राहतात. जवळपास त्यांची ३०-४० घरे या गावात आहेत. निर्धन, दारिद्र्य अवस्थेत मिळेल ते काम करुन उपजिविका करतात. अज्ञानाच्या अंधारात चाचपडत विकासाच्या किरणांचा अंधूकशा प्रकार नजरेसमोर काजव्या सारखा चमकताना पाहत झोपडीत राहून उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात दिवस काढत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. ज्यांना राहण्यासाठी घरे नाहीत, घराची ज्यांना नितांत गरज आहे. जे दारिद्र्यात जीवन जगत आहेत. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे. पत्त्याच्या बंगल्यासारखी ज्यांची घरे पडू शकतात. अशा घरात केवळ ताडपत्र्यांचा आधारावर ते राहत आहे. केवळ प्लॉस्टिकच्या ताडपत्र्या म्हणजे घराचे छत आहे.
अशा तिरपाल, झिल्लीच्या छतात आपल्या मुलाबाळांना घेवून पत्नीसह जिव मुठीत घेवून सोमा सुखराम पडोटी राहत आहेत. परंतु त्यांना अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. असे अनेक गरजवंत आहेत. पण त्यांना अद्यापही घरकुल मिळाले नाही. या गावातील गरजवंताना घरकुलाचा लाभ नाही. शौचालयाचे उघडे खड्डे, योजनेचे नावाखाली आर्थिक शोषण केले जात आहे.एकेकाळी आदर्श गाव म्हणून शासनाने आदर्श ग्राम योजनेत या गावाची निवड झाली होती.