जिल्ह्यातील ३०३३९ विद्यार्थ्यांनी घेतला स्वाध्यायमाला उपक्रमाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:59+5:302021-04-27T04:29:59+5:30
गोंदिया : राज्यात पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील ३१ लाखांहून अधिक विद्यार्थी पूर्वीच्याच तन्मयतेने आपल्या ...
गोंदिया : राज्यात पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील ३१ लाखांहून अधिक विद्यार्थी पूर्वीच्याच तन्मयतेने आपल्या वर्गाचा अभ्यास करण्यात गुंग आहेत. यात जिल्ह्यातील ३० हजार ३३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेषत: खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांचाच यात अधिक समावेश आहे.
कोरोना महामारीमुळे यंदा शाळाच भरू शकलेल्या नाहीत. त्यातच शालेय शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर नववी व अकरावीच्या परीक्षाही होणार नसल्याचे घोषित केले. त्यापाठोपाठ आता राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षाही रद्द केल्या. त्यामुळे यंदा परीक्षा न होताच सर्व विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी आपापल्या वर्गाचा मन लावून अभ्यास करीत आहेत. ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून स्वाध्याय हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमात प्रत्येक आठवड्याला त्या-त्या वर्गाचा अभ्यास व त्यावरील प्रश्न पाठविले जातात. व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी स्वाध्यायमध्ये सहभागी होऊन प्रश्न सोडवितात. असे २२ आठवडे आजवर पार पडले असून, आता २३ व्या आठवड्याचा अभ्यास सुरू आहे. स्वाध्याय उपक्रमाच्या ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सध्या पहिली ते दहावीपर्यंतचे तब्बल १३ हजार ३३९ विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. अभ्यास करणे म्हणजे केवळ परीक्षेत पास होणे एवढाच उद्देश नसतो, तर सर्वांगीण ज्ञान मिळविणे हाच उद्देश असला पाहिजे. आणि तोच उद्देश या १३ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी सिद्ध केला आहे.