३०५२ कामे ११ वर्षांपासून रखडलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:20 AM2019-03-03T00:20:38+5:302019-03-03T00:21:57+5:30

जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे करण्याचे प्रावधान केंद्र शासनाने केले आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची उत्तम अमंलबजावणी यापूर्वी झाली. परंतु यंदा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी जून्या कामांना प्राधान्य दिलेच नाही व नविन कामे सुरूही केली नाही.

3052 works left for 11 years | ३०५२ कामे ११ वर्षांपासून रखडलेली

३०५२ कामे ११ वर्षांपासून रखडलेली

Next
ठळक मुद्देशासन निर्णय डावलला : उपजिल्हाधिकाऱ्यांचे ‘ते’ पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी केले रद्द

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे करण्याचे प्रावधान केंद्र शासनाने केले आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची उत्तम अमंलबजावणी यापूर्वी झाली. परंतु यंदा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी जून्या कामांना प्राधान्य दिलेच नाही व नविन कामे सुरूही केली नाही. त्यामुळे ११ वर्षापासून जिल्ह्यातील रोहयोच्या ३ हजार ५० कामांना पुर्णत्वाची प्रतिक्षा आहे.
बेजगारीवर मात करण्यासाठी केंद्रशासनाने रोजगार हमी योजना जोमाने राबविण्याचे निर्देश दिले. परंतु नवीन कामे मला विचारल्याशिवाय करू नका, असा फतवा उपजिल्हाधिकारी मनरेगा यांनी काढून कामांना खीळ बसविली व जुन्या कामांकडेही लक्ष दिले नाही. त्यामुळे मागील ११ वर्षापासून कामे प्रलंबित असल्यामुळे जिल्ह्यातील लाखो मजूरांच्या हाताला काम नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यायला हवे होते.
ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार कामाला सुरूवात करायला पाहिजे होती. जी कामे अपूर्ण आहेत त्याच प्रकारची नवीन कामे सुरू करू नये असे असतांना जून्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था जून्या कामांची झाली आहे.
एखाद्या ग्राम पंचायतमध्ये अपेक्षीत मनुष्य दिवसाच्या मागणीपेक्षा अपूर्ण कामांवरील शिल्लक मनुष्य दिवसांची संख्या जास्त असल्यास नवीन कामांचे नियोजन न करता प्रथम कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या आहेत. त्या ग्रामपंचायतचे आर्थिक वर्ष २०१९-२० साठी मजूर आर्थिक संकल्पात हे अपूर्ण कामांवरील शिल्लक मनुष्य दिवसाच्या संख्येऐवढे निश्चीत करावे. ग्रामपंचायतमध्ये मजूरांच्या मागणीनुसार काम सुरू करताना सेल्फवरील कामे प्राधान्याने मजुरांना उपलब्ध करून देण्याचे काम रोजगार सेवकाचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी रोहयो यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. कंत्राटी कर्मचाºयांना धारेवर घेऊन कामे केल्यास तुमच्या खिशातून झालेल्या कामाचे पैसे वसूल करील अशी तंबी उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी पत्र क्र. ३२/२०१९ दिनांक ७ जानेवारी २०१९ ला या पत्रान्वये दिली होती. त्या पत्राला जिल्हाधिकाºयांनी रद्द केले आहे.

जि.प.च्या सभेत गाजला होता मुद्दा
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रोहयोच्या कामाचा मुद्दा अर्धा तास जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी गाजवला होता. त्यानंतर प्रकरणी मुकाअ डॉ. राजा दयानिधी यांच्याशी चर्चा केली. मुकाअ यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यावर जुनी कामे प्रलंबित असल्याचे लक्ष वेधले गेले. जिल्हाधिकारी यांनी या जुन्या कामांना पुर्णत्वास नेण्याची कारवाई त्वरीत करा असे पत्र काढले.

देवरी तालुक्यातील कामे रेंगाळलेली
सन २००५-०६ ते २०१५-१६ या ११ वर्षांच्या काळातील ३३६५ कामे रेंगाळलेली असल्याचे पत्र १ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी मनरेगाचे उपजिल्हाधिकारी कोरडे यांना दिले. जिल्हाधिकाºयांकडे प्रलंबित असलेल्या रोहयोच्या कामाची यादी गेली तेव्हा ३ हजार ३६५ कामे अपूर्ण होती. परंतु १ मार्च पर्यंत ३ हजार ५० कामे अपूर्ण असल्याची माहिती पुढे आली. यात सर्वाधीक अपूर्ण असलेल्या कामाची संख्या देवरी तालुक्यातील असून त्याची संख्या १२४७ अशी आहे. त्या पाठोपाठ अर्जुनी-मोरगाव ५३८, गोरेगाव ३९१, सडक-अर्जुनी ३१६, तिरोडा १७५, सालेकसा १५४, गोंदिया १२७ व आमगाव १०४ कामे अपूर्ण आहेत.

Web Title: 3052 works left for 11 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.