३१० भूमिहीन शेतकरी कुटुंबाना बायोगॅस संयंत्र
By admin | Published: July 4, 2016 01:29 AM2016-07-04T01:29:00+5:302016-07-04T01:29:00+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी बायोगॅस संयंत्र वरदान ठरत आहे. बायोगॅस संयंत्रामुळे भोजन व इतर घरगुती काम सहज होत आहेत.
तीन वर्षांतील आढावा: संयंत्रासाठी ३६ लाख ४० हजार खर्च
गोंदिया : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी बायोगॅस संयंत्र वरदान ठरत आहे. बायोगॅस संयंत्रामुळे भोजन व इतर घरगुती काम सहज होत आहेत. शिवाय महिलांना धूर व त्रासापासून सुटका मिळत आहे. यामुळे महिलांचे जीवनस्तर उंचावत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात मागील तीन वर्षात ३१० भूमिहीन शेतकऱ्यांच्या महिलांना बायोगॅस संयंत्र देण्यात आले आहे. यावर ३६ लाख ३९ हजार ६९४ रूपये खर्च करण्यात आलेत.
राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१३-१४ मध्ये ग्रामीण क्षेत्रातील १०० लोकांना बायोगॅस संयंत्र देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात आले. यावर्षी ११ लाख ४० हजार ७१२ रूपये अनुदान मिळाले असून त्यातून ११ लाख २७ हजार ७१२ खर्च करण्यात आले. सन २०१४-१५ मध्येही १०० कुटुंबांना बायोगॅस देण्यात आले असून त्यावर ११ लाख ६९ हजार १८ रूपये खर्च करण्यात आले.
सन २०१५-१६ मध्ये ११० कुटुंबांना बायोगॅस देण्याचे उद्दीट्ये होते व ते पुर्ण करण्यात आले. या वर्षासाठी मिळालेल्या १३ लाख ६३ हजार ३३६ रूपयांतून १३ लाख ४९ हजार ३६४ रूपये खर्च करण्यात आले. कृषी विभागाकडे ३३ हजार ४०० रूपये शिल्लक आहेत.
बायोगॅस संयंत्रासाठी देण्यात येणारा निधी अत्यंत कमी असल्याने तो वाढविण्यात यावा अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
अशांना मिळतो लाभ
ही योजना अल्पभूधारक, अतिअल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी आहे. लाभ घेण्यासाठी त्यांच्या नावावर शेतीचा सातबारा व ८ ‘अ’ चा उतारा असणे गरजेचे आहे. लाभार्थी भूमिहीन व शेतमजूर असल्यास तलाठ्याचे प्रमाणपत्र, ग्रामसेवकाचे ५ ते ६ म्हशी असल्याचे प्रमाणपत्र, स्वत:च्या खर्चातून बायोगॅस संयंत्र तयार करण्याचे अर्ज पंचायत समितीत करणे गरजेचे आहे.
९ हजारांचे अनुदान
सर्वसाधारण स्वच्छता व पर्यावरण संतुलनाच्या उद्देशातून राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. कृषि विभागाद्वारे २ ते ६ घनमीटर क्षमतेच्या एका बायोगॅस संयंत्रासाठी ९ हजार रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते. बायोगॅस संयंत्राला शौचालयास जोडल्यावर १२०० रूपयांचे अतिरिक्त अनुदान मिळेल. मागील तीन वर्षात २३० बायोगॅस संयंत्राला शौचालयास जोडले गेले. परिणामी गावात आता स्वच्छता नांदत आहे.