३२ मंडळात रंगला लोकमान्य उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 12:36 AM2016-09-22T00:36:14+5:302016-09-22T00:36:14+5:30
कोणत्याही स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येणाऱ्यांना जिल्हास्तरावर स्पर्धेत भाग घेता येते.
१४ मंडळांना मिळणार, १७ पुरस्कार
नरेश रहिले गोंदिया
कोणत्याही स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येणाऱ्यांना जिल्हास्तरावर स्पर्धेत भाग घेता येते. किंवा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक घेणाऱ्यांना जिल्हास्तरावर सहभागी केले जाते. परंतु शिक्षण विभागाने लोकमान्य उत्सवात कोणत्याही मंडळावर अन्याय होऊ नये म्हणून या स्पर्धेत उतरलेल्या जिल्ह्यातील ३२ ही मंडळांना जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी केले आहे. शासन निर्णयात जिल्हास्तरावर कोणत्या मंडळांना सहभागी करावे असे स्पष्ट नमूद नसल्यामुळे या स्पर्धेत उतरलेल्या ३२ मंडळांना जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी केले.
गणेशोत्सवातून मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावे, समाजात जनजागृती घडवावी यासाठी राज्य शासनाने यावर्षापासून स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन याविषयाला घेऊन लोकमान्य उत्सव साजरा केला. या उत्सवादरम्यान जिल्ह्यातील ३२ गणेश मंडळे सहभागी झाली असून यापैकी १४ गणेश मंडळांना १७ पुरस्कार दिले जाणार आहेत. लोकमान्य उत्सव साजरा करताना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शासनाने पाच विषय देऊन त्या विषयावर आकर्षक देखावे तयार करणाऱ्या मंडळांना तालुका स्तरापासून विभागस्तरापर्यंत प्रथम, व्दितीय व तृतीय असे रोख बक्षीस ठेवण्यात आले. परंतु तीन पुरस्कारासाठी कमीत कमी पाच मंडळे सहभागी व्हायला हवे, अन्यथा तीन पुरस्कार दिले जाणार नाही असे शासनाने सूचविले होते. एका तालुक्यातून चार मंडळे सहभागी झाल्यास त्या तालुक्याला फक्त दोन, तीन मंडळे सहभागी होणाऱ्या तालुक्याला फक्त एकच पुरस्कार देण्याचे शासनाने ठरविले.
त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील गणेश मंडळ सहभागी झाले असले तरी फक्त सहा तालुक्यातील मंडळांना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यातल्या गोरेगाव, गोंदिया व सालेकसा या तीन तालुक्यांना प्रत्येकी तीन पुरस्कार, तिरोडा व देवरी यांना प्रत्येकी दोन, आमगावला एक तर अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यात प्रत्येकी दोन मंडळ सहभागी झाल्याने हे तालुके तालुकास्तराच्या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. सामाजिक भान ठेवून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी जनजागृतीच्या दृष्टीने देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदि विषयांना घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या पाच पैकी एका संकल्पनेवर जनजागृती घडवून आणण्याचे काम करायचे होते.
जिल्ह्यात ९६३ ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापन केल्या होत्या. या स्पर्धेत जिल्हाभरातून ३२ मंडळे सहभागी झाले होते. सालेकसा तालुक्यातील पाच मंडळांपैकी एका मंडळाची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नोंदणी नव्हती परंतु शासनाने ३ सप्टेंबर रोजी काढलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पोलीस ठाण्याची परवानगी असेल ते मंडळही स्पर्धेत सहभागी होऊ शकतात असे सांगितले होते. जिल्हास्तरावरचे तीन पुरस्कार दिले जाणार आहे.
एकूण १७ पुरस्कार होत असले तरी हे पुरस्कार १४ गणेश मंडळांना दिले जाणार होते. परंतु तालुका स्तरावर क्रमांक न मिळालेले किंवा स्पर्धेअभावी तालुक्यातून वंचीत राहीलेल्या मंडळांना जिल्हास्तरावर पुरस्कार मिळाल्यास पुरस्कार घेणाऱ्या मंडळांची संख्या वाढणार आहे.
४.८० लाखांचे बक्षीस मिळणार
गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय असे २४ पुरस्कार तर जिल्हास्तरावर तीन पुरस्कार असे एकूण २७ पुरस्कार आहेत. प्रत्येक तालुक्याला तीन पुरस्कार द्यायचे होते. परंतु पाच किंवा त्यापेक्षा अधिक मंडळे सहभागी झाले असतील तर तीन पुरस्कार द्यावे, चार मंडळे सहभागी झालेत तर दोन पुरस्कार, तीन मंडळ सहभागी झालेत तर एकच पुरस्कार देण्याचे प्रावधान केल्याने अनेक मंडळांची गोची झाली. जिल्ह्यातील मंडळांना चार लाख ८० हजारांचे पुरस्कार दिले जाणार आहे.