३२ हजार नागरिकांनी केले 'महा ई-ग्राम' डाऊनलोड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 03:34 PM2024-09-11T15:34:27+5:302024-09-11T15:34:50+5:30
Gondia : अॅपवर मिळवा झटपट दाखला ग्रामपंचायतमधील ३३ प्रकारचे दाखले मोबाइलवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तंत्रज्ञान युग आले असल्याने घरबसल्या मोबाइलवर एका क्लिकवर सर्व गोष्टी मिळू लागल्या आहेत. शासनानेही तंत्रज्ञान विकसित करून नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार २२८ नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे अॅप डाउनलोड केले आहे. हे लोक ग्रामपंचायतमधील ३३ प्रकारचे दाखले घरी बसून घेऊ शकतात.
गावातील ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीशी अधिक संबंध असतो. त्यामुळे त्यांना लागणारे दाखले घेण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये जावे लागते. हव्या असलेल्या दाखल्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यांनतर ग्रामपंचायत प्रशासन अर्जावर प्रक्रिया करून हवा तो दाखला ग्रामस्थांना देते. मात्र, या प्रक्रियेत वेळ जात असल्याने शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट नावाने अॅप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मोबाइलवर ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळत आहेत. यासाठी आता अॅप डाउनलोड करून घरबसल्या दाखले मिळविले जाणार आहेत. त्यासाठी झटपट हे 'महा ई ग्राम' अॅप डाउनलोड करणे गरजचे आहे. जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींतर्गत हे महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट डाउनलोड झाले आहेत.
"महा ई-ग्राम सिटिजन अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यासाठी मोबाइलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथे महा ई-ग्राम सिटिजन कनेक्ट सर्च करायचे आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या हे अॅप मिळून जाईल किंवा खालील लिंकवरून डाउनलोड करा आणि नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीच्या सुविधा घ्याव्यात."
- गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग)
कोणते दाखले मिळणार?
महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट मोवाइल अॅप हे नागरिक सेवा मिळविण्यासाठी एक खास उपाय आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म, मृत्यू, विवाह, नमुना ८ (मूल्यांकन), बीपीएल असे प्रमाणपत्र मिळू शकते. नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर स्कॅनिंगचा वापर करून नागरिक आपला मालमत्ता कर ऑनलाइन भरू शकतात.
महा ई-ग्राम सिटिजन अॅप
- जनतेचा त्रास कमी कसा करता येईल यासाठी महाराष्ट्र शासन ऑनलाइन पद्धतीचा वापर करून महा ई-ग्राम सिटिजन कनेक्ट लॉन्च केले आहे.
- या अॅपद्वारे आपण घरबसल्या ग्रामपंचायतीचे सर्व दाखले मोबाइ- लद्वारे पाहू शकतो.
- याचबरोबर आपल्या ग्रामपंचाय- तीमध्ये असलेली कार्यकारिणी किंवा अधिकारी वर्ग यांची संपूर्ण माहितीसुद्धा या अॅपवर सहजरित्या बघता व त्यात माहिती भरता येणार आहेत.
अॅप डाउनलोड कसे कराल ?
- गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे अॅप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर आपला मोबाइल नंबरद्वारे रजिस्टर करायचे आहे.
- यामध्ये स्वतःची माहिती भरून अॅप सुरू होते. हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यासाठी मोबाइलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथे महा ई- ग्राम सिटिजन कनेक्ट सर्च करायचे आहे.
- हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या हे अॅप मिळून जाईल किंवा खालील लिंकवरून डाउनलोड करा आणि नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीच्या सुविधा घ्याव्यात.