३२ वर्षांनंतरही पिंडकेपार प्रकल्पाच्या समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:25 AM2018-01-17T00:25:21+5:302018-01-17T00:25:32+5:30

पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्प ३२ वर्षांनंतरही पूर्ण होवू शकला नाही. वन कायद्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे उत्पन्न होत आहेत. आता वन कायद्याच्या समस्या संपुष्टात आल्यावरही या प्रकल्पाच्या समस्या कमी न होता कायम आहेत.

32 years later, the problem of the Pindekar Project continued | ३२ वर्षांनंतरही पिंडकेपार प्रकल्पाच्या समस्या कायम

३२ वर्षांनंतरही पिंडकेपार प्रकल्पाच्या समस्या कायम

Next
ठळक मुद्दे४० कोटींपैकी फक्त १२ कोटी खर्च : सुधारित प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पिंडकेपार लघू सिंचन प्रकल्प ३२ वर्षांनंतरही पूर्ण होवू शकला नाही. वन कायद्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे उत्पन्न होत आहेत. आता वन कायद्याच्या समस्या संपुष्टात आल्यावरही या प्रकल्पाच्या समस्या कमी न होता कायम आहेत. त्यामुळेच सदर प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे.
पिंडकेपार नाल्यावर प्रस्तावित करण्यात आलेल्या या लघू सिंचन प्रकल्पाचे काम रोजगार हमी योजनेंतर्गत सन १९८३-८४ मध्ये सुरू करण्यात आले होते. आर्थिक वर्ष १९८८-८९ मध्ये वन कायद्याच्या अडचणींमुळे हे काम बंद झाले होते. यानंतर वन कायद्याची अडचण सोडविण्यात आली. त्यानंतरही प्रकल्पाच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. आतापर्यंत सुमारे १२ कोटी रूपये यावर खर्च झाले असूनही मोठ्या प्रमाणात काम बाकीच आहे.
प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर त्याच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या परिसरात मोठे परिवर्तन झाले आहे. या प्रकल्पांतर्गत नागरी भागांमधून कालवा गेल्यामुळे जमिनीचे अभिरेखन करण्यात आले. त्यामुळे कृषी जमीन कमी झाली.
ही परिस्थिती पाहून नवीन प्रस्तावाला शासन मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सद्यस्थितीत सुधारित प्रशासकीय मान्यता तयार केली जात आहे. उर्वरित कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता तांत्रिक सल्लागार समितीजवळ सादर आहे.
प्रकल्पाची सिंचन क्षमता घटली
या प्रकल्पाच्या पाळीची लांबी आता कमी करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या शेवटी डूबित क्षेत्र ३७७.३९ हेक्टरपेक्षा कमी करून २५७.२५ हेक्टरपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी संग्रहाची क्षमता ८.५५५ दलघमीऐवजी ७.०६४ दलघमी करण्यात आली आहे. प्रकल्पाचे लाभ क्षेत्र १२६२ हेक्टर एलबीसी पूर्णपणे हटविण्यात आले आहे. ११७० हेक्टर आरबीसी प्रस्तावित करण्यात आली आहे.
सहा गावांना सिंचन व पाच गावांना पिण्याचे पाणी
या प्रकल्पामुळे गोंदिया तालुक्याच्या कारंजा, फुलचूर, डव्वा, तुमखेडा खुर्द, खमारी व हलबीटोला येथील ११७० हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा होणार आहे. याशिवाय गोंदिया पॅरा अर्बन टप्पा- २ अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाईल. त्यासाठी १.७७ दलघमी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. जलाशयाला लागून फुलचूर व फुलचूरटोला, नंगपुरा-मुर्री, पिंडकेपारटोला व कारंजा या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा काम केले जात आहे.

Web Title: 32 years later, the problem of the Pindekar Project continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.