‘शेअर ट्रेडिंग’मध्ये ८ टक्के नफा देतो म्हणत ५ जणांना ३.२० कोटींचा गंडा; आमगावच्या दोन भावंडांवर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Published: June 14, 2024 08:11 PM2024-06-14T20:11:47+5:302024-06-14T20:12:27+5:30

पाच जणांची झाली फसवणूक

3.20 crores to 5 people claiming to give 8 percent profit in 'share trading'; | ‘शेअर ट्रेडिंग’मध्ये ८ टक्के नफा देतो म्हणत ५ जणांना ३.२० कोटींचा गंडा; आमगावच्या दोन भावंडांवर गुन्हा दाखल

‘शेअर ट्रेडिंग’मध्ये ८ टक्के नफा देतो म्हणत ५ जणांना ३.२० कोटींचा गंडा; आमगावच्या दोन भावंडांवर गुन्हा दाखल

गोंदिया : शेअर मार्केटच्या नावावर ३.२० कोटीने फसवणूक करणाऱ्या दोन भावंडांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोन भावंडांनी पाच जणांची फसवणूक केली आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी ७ ते ८ टक्के परतावा देण्याचे आमिष देत त्यांनी लोकांना लुटले. प्रथमदर्शनी पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आमगाव शहरातील बनिया मोहल्लातील किसन चंपालाल पांडे (२१) व कन्हयालाल चंपालाल पांडे (२४) या आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना ७ ते ८ टक्केप्रमाणे प्रतिमहिना परतावा (रिटर्न) देण्याचे आमिष दाखवून बनगाव येथील चल्वुराज व्यंकटरंगप्पा कमैय्या (५८) यांच्याकडून ३ कोटी १९ लाख ७५ हजार रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला. आरोपी भावंडांनी कमैय्या यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीकरिता पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला ७ टक्के दराने व्याज देऊ, असे आमिष दाखवले. सुरुवातीला कमैय्या तयार झाले नाहीत. परंतु, सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले. सन २०२३ला दिलेल्या पैशांची गरज असल्याने कमैय्या यांनी किसन पांडे याच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली. परंतु तो नेहमी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ करू लागला. किसन पांडे यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या घराबाहेर आदिशक्ती ॲग्रो कंपनी, श्री कुबेरजी ॲग्रो कंपनी, श्री कुबेरजी ट्रेडिंग कंपनी, श्री कुबेरजी इंपोर्ट व एक्सपोर्ट कंपनी, धन कुबेरजी इन्फ्रा प्रा. लि., दर्शिका ट्रेडर्स नावाच्या कंपन्यांचे बोर्ड लावलेले दिसून आले. ३ कोटी १९ लाख ७५ हजाराने फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडांवर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४१८, ४०३, ४०६, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आसाराम चव्हाण तपास करीत आहेत.

या चौघांची झाली फसवणूक

बनगाव येथील चल्वुराज व्यंकटरंगप्पा कमैय्या (५८) यांच्यासह रश्मी ओंकार शेंडे (६०, रा. आमगाव) यांच्याकडून जुलै २०२३मध्ये १२ लाख रुपये, मनोहर हरिचंद बावणकर (५८, रा. बनगाव) यांच्याकडून १ जून २०२१पासून २ कोटी रुपये, नारायण धनलाल उपराडे (७०, रा. बनगाव) यांच्याकडून १५ डिसेंबर २०२१ पासून ११ लाख रुपये घेऊन आरोपींनी त्यांची फसवणूक केली. या चौघांकडून आरोपींनी ३ कोटी १९ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत पुढे आले आहे.

तीन वर्षांपासून सुरू होता गोरखधंदा

जून २०२१पासून आजपर्यंत हा गोरखधंदा आमगावात सुरू होता. या तीन वर्षात त्यांनी शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडविल्याची माहिती आहे. आता या प्रकरणातील तक्रारदार हळूहळू पुढे येतील.

जमीन विक्रीचे पैसे आरोपींना दिले

कमैय्या यांच्याकडे माल्ही येथील जमीन विक्रीचे १ कोटी ३५ लाख रुपये घरी होते. त्यांनी २९ एप्रिल २०२३ ला २५ लाख, ७ जुलै २०२३ ला २० लाख, ११ ऑगस्ट २०२३ ला १ लाख, १० ऑक्टोबर २०२३ ला ७५ हजार, ११ डिसेंबर २०२३ रोजी १५ लाख असे ६१ लाख ७५ हजार रुपये चेकव्दारे आरोपींना दिले. डिसेंबर २०२३ मध्ये उर्वरित ८५ लाख रुपये कॅशमध्ये पंडित अनिल गोविंदप्रसाद गौतम व रामकिसन भैय्याजी शिवणकर (रा. बनगाव) यांच्या समोर किसन पांडे याला त्याच्या घरी दिले.

कमैय्या यांना दिले सिक्युरिटी म्हणून पाच चेक

पाच महिन्यात पैसे परत करतो, तुम्ही विक्री केलेल्या जमिनीचे पैसे तुमच्याकडे आहेत, ते पैसे मला द्या, माझ्यावर विश्वास नसेल, तर हे पाच चेक ठेवा, म्हणत १ मे २०२४ या तारखेचे ४ चेक आरोपींनी दिले. १ जून २०२४ च्या तारखेचा आणखी एक चेक दिला.

Web Title: 3.20 crores to 5 people claiming to give 8 percent profit in 'share trading';

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.