३२४५ कर्मचाऱ्यांचा मोर्चात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:06 PM2017-12-18T23:06:48+5:302017-12-18T23:07:09+5:30
कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करा या एकच मागणीसाठी सोमवारी (दि.१८) उसळलेल्या कर्मचाऱ्यांच्या महामुंडन मोर्चाने शासन पूर्णत: धास्तावले.
आॅनलाईन लोकमत
वडेगाव : कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करा या एकच मागणीसाठी सोमवारी (दि.१८) उसळलेल्या कर्मचाऱ्यांच्या महामुंडन मोर्चाने शासन पूर्णत: धास्तावले. या मोर्चात एक दोन नव्हे तब्बल १३ लोकप्रतिनिधींनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन उतारवयात दुबळे बनविणारी अंशदायी पेंशन योजना बंद करुन १९३२ ची जुनी पेंशन योजना लागू करा या एकमेव मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या महाआक्रोश मुंडन मोर्चाला रविवारी (दि.१६) गोंदियातून शेकडो मुंडन केलेले कर्मचारी नागपूरला रवाना झाले.
सकाळी संपूर्ण गोंदिया मुंडन केलेल्या कर्मचाऱ्यांनी गजबजत होते. बॅनर, होर्डींग किंवा गजर अशी कुठलीही पद्धती डावलून अगदी प्रामाणिकपणे निघालेल्या या मोर्चात सहभागी प्रत्येक कर्मचारी मुंडन करून तसेच काळा पँट, पांढरा शर्ट व टोपी अशा शिस्तबद्ध गणवेशात निषेध नोंदवित मोर्च्यात सहभागी झाले.
सदर मोर्चात गोंदिया जिल्ह्यातून एकूण ८९ चारचाकी वाहने व इतर कर्मचारी रेल्वे आणि बसेसने मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यात गोंदिया जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके, सचिव सचिन राठोड, तालुकाध्यक्ष संतोष रहांगडाले, सुभाष सोनेवाने, भूषण लोहारे, शीतल कनपटे, महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.
शासनाने लादलेल्या अंशदायी पेंशन योजनेच्या विरोधात जुनी पेंशन हक्क संघटनेने अधिकारी, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांपर्यंत निवेदन दिले. यासाठी कित्येकदा आंदोलन करण्यात आले. मात्र त्यांच्या या निवेदन व आंदोलनांचे काहीच फ लीत लाभले नाही. अखेर सरकारच्या या निष्ठूर भूमिकेला त्रासून संघटनेने महाआक्रोश व्यक्त करण्यासाठी मुंडन मोर्चाचे शस्त्र उपसले. यातूनच मुंडन करून कर्मचाºयांनी आपला रोष व्यक्त करीत पुन्हा एकदा जुन्या पेंशनची मागणी रेटून धरली.