४३ दिवसांत ३४ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:17 AM2017-05-14T00:17:29+5:302017-05-14T00:17:29+5:30

बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादग्रस्त असते. बाल व माता मृत्यूमुळे येथील डॉक्टरांनाही मारहाण केली जाते.

34 children die in 43 days | ४३ दिवसांत ३४ बालकांचा मृत्यू

४३ दिवसांत ३४ बालकांचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादग्रस्त असते. बाल व माता मृत्यूमुळे येथील डॉक्टरांनाही मारहाण केली जाते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील बालमृत्यूमुळे जिल्हाचा बालमृत्यूदर वाढत असते. १ एप्रिल २०१७ पासून १३ मे २०१७ या ४३ दिवसाच्या काळात एकमेव बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात ३४ बालकांचा मृत्यू झाला आहे.
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय एचआयव्ही बाधीत रक्त पुरवठा असो किंवा मातामृत्यू बालमृत्यू असो यामुळे बरिच गाजली आहे. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या अधिनस्त असताना या रूग्णालयात गैरसोय होती परंतु आताच्या परिस्थितीपेक्षा सुधारलेली होती. आतापर्यंत गंगाबाईची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. येथील बालमृत्यूचे प्रकरण केंद्रापर्यंत गाजले होते. मधातल्या काळात हे प्रमाण कमी झाले होते. परंतु आता पुन्हा हे प्रमाण वाढले आहे. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या प्रसूती कक्षात १ एप्रिल पासून आतापर्यंत १६ बालकांचा मृत्यू झाला. त्यात ११ बालके एप्रिल महिन्यात तर ५ बालके मे महिन्यात मृत्यू पावली आहेत. त्यात गंगाझरीच्या सहेसपूर येथील कामेश्वरी तुलसीनाथ पताहे या महिलेने २ किलो ५०० ग्रॅम वजनाचे जन्माला घातलेली मुलगी शुक्रवारच्या रात्री ९.३० वाजता मृत्यू पावली. त्यानंतर मरारटोली येथील शारदा मनिष पडोरे यांची २ किलो वजनाची मुलगी शनिवारच्या पहाटे १ वाजता दगावली.
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात यापेक्षाही बिकट स्थिती आहे. एप्रिल महिन्यात अतिदक्षता कक्षात १२ बालकांचा मृत्यू झाला. तर मे महिन्यात सहा बालकांचा मृत्यू झाला.
३ मे रोजी गोरेगाव तालुक्याच्या सोगाव येथील खेमेश्वरी टेंभरे या महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. ते दोन्ही बाळ दगावले आहेत. त्यातील एक बाळ ८०० ग्रॅम तर दुसरा ७५० ग्रॅम वजनाचा होता. याच दिवशी गोरेगाव येथील, शशीकला कटरे या महिलेचा ९४० ग्रॅम वजनाचे बाळ दगावले. ७ मे रोजी आमगाव तालुक्याच्या करंजी येथील आशा बागडे या महिलेचे ७३५ ग्रॅम वजनाचे बाळ दगावले. ८ मे रोजी गोरेगाव तालुक्याच्या घुमर्रा येथील सुनिता बिसेन या महिलेचे २ किलो वजनाचे बाळ दगावले. तर १३ मे रोजी शनिवारी खमारी येथील गंगा मेश्राम या महिलेचे २ किलो २२५ ग्रॅम वजनाचे बाळ दगावले. ४३ दिवसाच्या काळात एकट्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात ३४ बालकांचा मृत्यू झाला आहे.

मनुष्यबळाचा अभाव
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टर, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. ज्या ठिकाणी ६ डॉक्टर काम करायला हवेत त्या ठिकाणी दोन डॉक्टर काम करीत आहेत. त्यातीलही काही डॉक्टरांना स्वत:च्या कामासाठी सुटीवर जावे लागले तर एकाच व्यक्तीला आपला वॉर्ड सांभाळावा लागतो. एका व्यक्तीला सतत १६ तास नोकरी करावी लागते. रूग्णांची रेलचेल असताना प्रत्येक रूग्णाला पुरेशा वेळ येथील डॉक्टर देऊ शकत नाही. परिणामी बालमृत्यूचा आकडा वाढत आहे.

तीन बालकांच्या मृत्यूने गंगाबाईत गोंधळ
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तीन बालकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. जन्मा आलेले बाळ सुदृढ होते. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. परिणामी एका बालकांची उत्तरीय तपासणी करविण्यात आली.
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सहेसपूर येथील कामेश्वरी तुलसीनाथ पताहे या महिलेला प्रससूतीसाठी ११ मे रोजी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीच्या वेळी असह्य वेदना होऊनही प्रसूती होत नसतांना वारंवार डॉक्टरांना बोलावूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. तिची शस्त्रक्रिया करण्यात यावी, असे नातेवाईकांनी डॉक्टरांना म्हटले परंतु डॉक्टरांनी ऐकले नाही. दरम्यान शुक्रवारच्या रात्री कामेश्वरीची सामान्य प्रसूती झाली. प्रसतीनंतर काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान नातेवाईकांना गोंधळ घातला.त्यामुळे रूग्णालयातील काही डॉक्टर पसार झाले. यावेळी गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉ. पटले व डॉ. भारती होते असे सांगितले जाते. गंगा मेश्राम यांचे बाळ नवजात अतिदक्षता कक्षात तर शारदा पडोरे यांचे बाळ प्रसूती कक्षात दगावले.

गर्भातच अनेकांचा मृत्यू
जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. आरोग्या विषयी येथील जनात पाहिजे त्या प्रमाणात जागृत नाही. गर्भवती असलेली महिला गरोदरपणाच्या संपूर्ण काळ वांगा व भातावर घालवते. पोषण आहार त्या घेत नाही. त्यामुळे पोटातच बालके कुपोषित होता. नियमित आरोग्य तपासणी करीत नसल्यामुळे पोटातच बाळाचा मृत्यू होतो. प्रसूतीसाठी आलेल्या अनेक महिलांच्या पोटातून (आयुडी) मृत पावलेले बाळ जन्माला येते. त्यासाठी गर्भवतींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी संपूर्ण जबाबदारी स्विकारणे गरजेचे आहे
 

Web Title: 34 children die in 43 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.