वन कामगारांना सेवेत समायोजनासाठी ३४ वर्षांचा प्रवास
By Admin | Published: March 1, 2016 01:14 AM2016-03-01T01:14:13+5:302016-03-01T01:14:13+5:30
सामाजिक वनीकरण व वनविभागातील अनेक वनकामगार शासन सेवेत कायम करावे ..
स्वप्न अपूर्णच : संघटनांना मिळाले नुसते आश्वासन
आमगाव : सामाजिक वनीकरण व वनविभागातील अनेक वनकामगार शासन सेवेत कायम करावे यासाठी सलग ३४ वर्षापासून लढा देत आहेत. परंतु वनविभागाने या वनमजुरांच्या मागणीकडे पाठ फिरवली आहे. राजकीय पुढाऱ्यांनी वनमजुरांना कायम करणार अश्या घोषणा दिल्या परंतु मंत्रालयाचा गाफीलपणाही फोल ठरला. त्यामुळे या वनमजुरांची दैनावस्था आहे.
जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण व वनविभागातील वनमजूर विभागातील रोपवन वाटीका, वृक्ष लागवड व इतर योजनातील रोजंदारी कामाकरीता नियमितपणे कार्य करीत आहेत. शासनाच्या ध्येय धोरणाला यशस्वी करण्याकरिता वनमजूरांनी अल्पशा मिळणाऱ्या दैनंदीन परिश्रमावर काम केले. या वनमजूरांना नियमित करावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न घालविण्यात आले. परंतु पोकळ आश्वासनापुढे या वनमजूरांना न्याय मिळाला नाही.
सामाजिक वनीकरण उपविभाग आमगाव येथील वनमजूर १९८२ पासून या विभागात मिळेल त्या मोबदल्यात काम करीत आहेत. शासन या वनमजूरांना कालांतराने सेवेत सामावून घेणार या आशेवर वनमजूृरांनी मिळणाऱ्या परिश्रमाचे कधी मोल ठरविले नाही. विभागाने या वनमजूरांकडून शासनाच्या योजनांची यशस्वीमुळे रोवली. त्यामुळे जिल्ह्यात वनसंपदेचे चित्र चांगले उभे आहे.
सामाजिक वनीकरण व वनविभाग यातील काम करणाऱ्या वनमजूरांना विभागाने सेवा जेष्ठता यादी तयार करून दिली. तर सेवा जेष्ठता यादी शासनस्तरावर मागविण्यात आली होती. वनमजूरांना सेवा जेष्ठता यादीप्रमाणे शासनाने विभागात सामावून घेण्यासाठी प्रक्रियाही चालविली. परंतु शासनाने वनविभाग व सामाजिक वनीकरण या विभागात तफावत दाखवीत वनमजूरांना दोन फळीत विभागले. त्यामुळे वनमजुरांचा प्रश्न निकाली लागला नाही. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातील वनमजूरांना न्याय मिळावा यासाठी अनेकदा संघटनाच्याद्वारे शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा करण्यात आला परंतु त्यांना पुढाऱ्यांनी आश्वासना पलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे वनमजुरांचे प्रश्न आजही कायम आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
वन मजुरांची संधी न देता नवीन भरती
सामाजिक वनीकरण विभागात अनेक वर्षापासून वनमजूरांनी आपले आयुष्य घालविले. या वनमजूरांना शासनाने विभागात सामावून घेण्याची प्रक्रिया केली नाही. तर उलट या विभागांमध्ये नवीन पदभरती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या या वनमजूरांवर अन्याय होत आहे.
स्थायी नोकरीच्या आशेवर आयुष्याचा अंत
सामाजिक वनीकरण विभागात काम करणारे वनमजूर सलग ३४ वर्षापासून स्थायी होण्याच्या आशेवर जीवन जगत आहेत. परंतु या आशेच्या किरणांवर आयुष्याचेच अंत वनमजुरांना बघावे लागत आहे. यात अनेक वनमजूर वयोवृध्द झाले तर काही वनमजुरांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अवघे कुटूंबाची दारिद्रयाच्या वाटेवर आहे.
समायोजनात तफावत, वनमजूर हतबल
सामाजिक वनीकरनाने शासन स्तरावर एकदा तफावत समायोजन प्रक्रिया पूर्ण केली. यात सेवाजेष्ठता यादीतील मोजक्या वनमजुरांना शासन सेवेत सामावून घेण्यात आले. नंतर याच यादीतील प्रतीक्षीत असणाऱ्या वनकामगारांना समायोजन करण्यात आले नाही. उलट समायोजन झालेल्या काहींना विभागाने त्यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्यावर अन्याय केला. त्यामुळे या वनमजुरांवर आता उपासमारीची पाळी आली आहे.