३४५ शिक्षकांना तूर्त दिलासा

By admin | Published: June 11, 2016 01:51 AM2016-06-11T01:51:56+5:302016-06-11T01:51:56+5:30

जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या नियमांना डावलून करण्यात आल्याचा आरोप

345 teachers got relief soon | ३४५ शिक्षकांना तूर्त दिलासा

३४५ शिक्षकांना तूर्त दिलासा

Next

प्रशासकीय बदल्यांना स्थगिती : शिक्षक संघाच्या प्रयत्नांना आले यश
गोंदिया : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या नियमांना डावलून करण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर ग्राम विकास व जलसंधारण विभागाचे कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी या बदल्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. परिणामी बदली झालेल्या ३४५ शिक्षकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
कार्यरत असलेल्या शाळांना डिजीटल करण्यासाठी मोठा खटाटोप करणाऱ्या शिक्षकांना प्रशासकीय बदलीत दुसऱ्या शाळेत जावे लागत होते. तसेच सदर बदल्या करताना जि.प.च्या शिक्षण विभागाने नियमांना धाब्यावर बसवून बदल्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केला होता. हे प्रकरण ३ जूनपासून गाजत आहे. या प्रकरणाला घेऊन खा.नाना पटोले, तिरोडाचे आ.विजय रहांगडाले व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी हा मुद्दा मंत्रालयापर्यंत नेऊन जि.प.ने केलेल्या बदल्यांवर स्थगिती आणली.
जि.प.ने ३४५ शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या, तर १०७ लोकांना बदलीतून विविध कारणे दाखवून सूट दिली होती. ४९ शिक्षक अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी होते, त्यांना मात्र जागा नसल्याचे दाखवून हलविले नाही. हा सर्व प्रकार पाहून शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, नूतन बांगरे, यू.पी. बांगरे, सुधीर बाजपेयी, शंकर नागपुरे, शंकर चव्हाण यांनी पुढाकार घेऊन आ.विजय रहांगडाले यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे व्यथा मांडल्यावर त्यांनी शिक्षकांचे शिष्टमंडळ मुंबईला घेऊन गेले. जि.प.ने ३ जून रोजी सार्वत्रिक बदल्यांच्या समूपदेशन कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात अनियमीतता केली.
महाराष्ट्र शिक्षक संघाच्या या मागणीला पुढे रेटण्यासाठी केदार गोटेफोडे, नागसेन भालेराव, अयुब खान, पवन कोल्हे, वाय.एस. मुंगुलमारे, वाय.एस. भगत, बी.बी. ठाकरे, अनिरूध्द मेश्राम, चंद्रशेखर दमाहे, ए.जी. पठाण, ओमप्रकाश डहाके, पी.के. पटले, रमेश संग्रामे, पी.के. लोथे, वाय.बी. पटले, विजय बिसेन, डी.पी. बोरकर, दुर्गा कोकोडे, राजू गुनेवार, अरविंद नाकाडे, एन.जे. चव्हाण, लक्षमी हविणखेडे, एन.एस. कोरे, रमेश भलावी, ओमेश्वरी बिसेन, श्रीधर पंचभाई, डी.बी.पटले, अनिता माकडे, कल्पना मानकर व पुष्पा पटले यांनीही सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

अशी झाली अनियमितता

प्रशासकीय बदली पात्र शिक्षकांची यादी विहीत कालावधीत प्रसिध्द केली नाही. कार्यशाळेच्या १६ तासापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेली यादी दोषपूर्ण होती, मात्र आक्षेप घेण्यास वेळ देण्यात आला नाही. समूपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्याकरीता शिक्षकांना कोणत्याही प्रकारची लेखी सूचना देण्यात आली नाही. प्रशासकीय बदलीने रिक्त होणाऱ्या व उपलब्ध रिक्त पदांची पूर्ण व अचूक माहिती समुपदेशनाच्या किमान दोन दिवसाअगोदर कार्यशाळेत दाखविण्यात आली नाही. नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या बळजबरीने बदल्या करण्यात आल्या. पती-पत्नी एकत्रिकरणाला बगल दिली. जिल्हा पातळीवरील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बदलीतून सूट देण्यात आली नाही. सन २०११-१२ मध्ये प्रशासकीय बदल्यांतील शिक्षकांची पुन्हा प्रशासकीय बदली करण्यात आली. आजारी शिक्षकांची सूड भावनेडून नक्षलग्रस्त भागात बदली करण्यात आली. मराठी माध्यमांवर हिंदी शिक्षक व हिंदी माध्यमांवर मराठी शिक्षक देण्यात आले. आपल्या मर्जीतील शिक्षकांना कोणतेही कारण नसताना बदलीतून सूट देण्यात आली, असे अनेक आरोप या बदल्यांसंदर्भात झाले.

Web Title: 345 teachers got relief soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.