नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर ३५ बसफेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:31 AM2018-12-02T00:31:42+5:302018-12-02T00:32:09+5:30
नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (पीएलजीए) सप्ताहाला रविवार २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सप्ताहादरम्यान नक्षलवादी कारवायांत वाढ होत असते. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (पीएलजीए) सप्ताहाला रविवार २ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या सप्ताहादरम्यान नक्षलवादी कारवायांत वाढ होत असते. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केले आहे. तर गोंदिया आगाराने नक्षलप्रभावित भागातील ३५ बसफेºया रद्द केल्या आहेत.
दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षलवादी पीएलजीए सप्ताह पाळतात. सप्ताहाच्या कालावधी नक्षलप्रभावित भागात नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होत असते. मात्र गोंदिया जिल्ह्यात मागील सात आठ वर्षांत पोलीस विभागाच्या योग्य नियोजनामुळे एकही मोठी घटना घडली नाही. जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे ६ दलम कार्यरत असल्याची माहिती पोलिस विभागाच्या सूत्रांनी दिली. यामध्ये देवरी, सालेकसा, तांडा, कोरची व कुरखेडा दलमचा समावेश आहे. नक्षलवादी गोंदिया जिल्ह्यातील जंगलांचा उपयोग रेस्ट झोन म्हणून करीत असल्याचे बोलल्या जाते.लगतच्या गडचिरोली व छत्तीसगडच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया फार कमी आहेत.
जिल्ह्यातील सालेकसा, दरेकसा, तसेच देवरी तालुक्यातील ककोडी, चिचगड या परिसरात अधून मधून नक्षलवादी कारवाया होत असतात. मात्र पीएलजीए सप्ताहा दरम्यान या भागातील नागरिकांमध्ये थोड्याफार प्रमाणात भीतीचे वातावरण असते.या दरम्यान काळी-पिवळी व आॅटोची वाहतूक पूर्णपणे बंद असते. याचा परिणाम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर सुध्दा होतो. सप्ताह दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून गोंदिया आगाराने सालेकसा तालुक्यातील मानव विकास योजनेच्या सात बसेस बंद केल्या आहेत. तर गोंदिया-डोंगरगड ही बससेवा केवळ सालेकसापर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. तर मलाजखंडची बस देखील मधातूनच परत गोंदियाला येणार आहे. चांदसूरज, बंजारी, खोलगड, बिजेपार या गावातील प्रवाशांना सप्ताहा दरम्यान बससेवेपासून वंचित राहावे लागणार आहे. गोंदिया आगार व्यवस्थापक पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलप्रभावित भागातील बसेस रात्रीच्या वेळेस पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात येणार आहे. या सप्ताहामुळे ३५ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगितले. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलप्रभावित भागातील पोलिसांना व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना सुध्दा सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
पोलीस यंत्रणा सज्ज
गोंदिया: सीपीआय माओवादी संघटनेच्या नक्षलवाद्यांकडून २ ते ८ डिसेंबर दरम्यान पीएलजीएस सप्ताह स्थापना दिवस म्हणून नक्षलवादी साजरा करतात. या सप्ताहात नक्षलवाद्यांकडून घातपातचे कृत्य होऊ नये,यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
या सप्ताहात नक्षलवादी घातपाताचे कृत्य करतात, महत्वाच्या व्यक्तीचे अपहरण, खून , जाळपोळ यासारखे गंभीर गुन्हे करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतात. सदर कालावधीत नक्षलवादी आक्रमक भूमिका घेऊन अटक असलेल्या नक्षलवाद्यांना पळवून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पीएलजीए सप्ताहाच्या काळात नक्षलवाद्यांकडून घडवून आणल्या जाणाºया हिंसक कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ ते १० डिसेंबरपर्यंत पोलिसांचा नक्षलग्रस्त भागात चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.नक्षलवाद्यांचे कुटील डाव वेळीच हाणून पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
नक्षलप्रभावीत भागातील पोलीस स्टेशन, दूरक्षेत्रातील पोलीस चौकीत कार्यरत जवांनाना सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलीसांच्या पेट्रोलिंगमध्ये वाढ केली आहे. नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलीस विभागाची बारीक नजर आहे.
हरिष बैजल, जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया