३५ हजार नागरिकांनी धरली ग्रामगीतेची कास
By admin | Published: October 11, 2015 12:55 AM2015-10-11T00:55:47+5:302015-10-11T00:55:47+5:30
‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू पडतात.
विविध टप्प्यात देताहेत परीक्षा : ३५० शाखांमधून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार
नरेश रहिले गोंदिया
‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या तत्कालीन पिढीतील गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक त्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवित आहेत. गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रसंतांच्या विचारधारेवर चालणारे ३५ हजार लोक असून आजही त्यांच्या साहित्याचे वाचन करून ग्रामगीताचार्य पदवी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कीर्तनातून प्रेरणा मिळालेले जिल्ह्यातील त्यावेळचे बालक आताचे जेष्ठ नागरिक आहेत. आताही ते गावागावांत गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करतात. व्यसनाधीनता, दारू, गांजा, चोरी यावर तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनांच्या माध्यमातून जनजागृती करतात. भ्रूणहत्या, आत्महत्या करु नका असा संदेश देत शरीर स्वच्छतेबाबत वैचारिक दृष्टीकोन बदलविण्यासाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता, लहर की बरखा, अभंग, विविध भजनांची पुस्तके समग्र वाङमयाच्या माध्यमातून प्रबोधन करणे सुरू आहे.
ग्रामगीताचार्य परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रवीण परीक्षा, ग्रामनाथ, ग्रामरत्न ह्या परीक्षा आधी उत्तीर्ण कराव्या लागतात. वर्ग ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा आतापर्यंत १५ हजार बालकांनी ही परीक्षा दिली आहे. वर्ग ८ ते १० वी च्या विद्यार्थ्यांना परिचय परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा १० हजार बालकांनी दिलेली आहे. दहावीनंतरच्या लोकांसाठी गट क्र.३ मध्ये प्रवीण परीक्षा घेतली जाते. दहा हजार लोकांनी ही परीक्षा आतापर्यंत दिली आहे. ग्रामनाथ ही परीक्षा २००० लोकांनी दिली आहे. त्यानंतर घेण्यात येणारी ग्रामरत्न परीक्षा २०० लोकांनी दिली आहे, तर ग्रामगीताचार्य ही परीक्षा सात जणांनी उतीर्ण केली आहे.