३७ रेतीघाट लिलावासाठी सज्ज
By Admin | Published: January 3, 2015 01:26 AM2015-01-03T01:26:25+5:302015-01-03T01:26:25+5:30
तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ३७ रेतीघाटांच्या लिलावासाठी अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. येत्या १६ जानेवारीला या घाटांचा लिलाव होणार आहे.
मनोज ताजने गोंदिया
तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील ३७ रेतीघाटांच्या लिलावासाठी अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. येत्या १६ जानेवारीला या घाटांचा लिलाव होणार आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रेतीमाफियांकडून सुरू असलेल्या अवैध रेती उपशाला आळा बसणार आहे.
जिल्ह्यात एकूण १०७ रेतीघाट आहेत. त्यापैकी भूजल सर्व्हेक्षण विभागाने ४९ घाटांना लिलावास पात्र ठरविले होते. मात्र भौगोलिक अडचणींमुळे ४ रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करणे कठीण असल्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाकडून ४५ घाटांचाच प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला. त्यापैकी ३७ घाटांना मंजुरी मिळाली. त्या ३७ घाटांची किमान किंमत (अपसेट प्राईज) ठरवून तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. त्यांनी या लिलावाला अंतिम मंजुरी दिली आहे. ई-टेंडरिंग पद्धतीने ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी संबंधित कंत्राटदारांची प्रशिक्षण कार्यशाळाही घेतली जात आहे. येत्या ८ तारखेला आॅनलाईन निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर १६ जानेवारी रोजी या निविदा उघडल्या जातील.
३७ रेतीघाटांमधून २ कोटी ८२ लाख ५५ हजार ५०० रुपये किमान महसूल मिळणे अपेक्षित आहे.
सर्व रेतीघाटांचा लिलाव झाल्यास यापेक्षा जास्त महसूल मिळू शकतो. परंतू गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता सर्व रेतीघाटांचा लिलाव होणार की नाही याबाबत कोणतीही शाश्वती नाही. यावर्षी लिलाव होणाऱ्या घाटांची मुदत ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत राहणार आहे.
गेल्यावर्षी २७ घाटांमधून २.२० कोटींचा महसूल
गेल्यावर्षी लिलावासाठी ४४ रेतीघाट पात्र ठरले होते. त्यातून ४ कोटी १५ लाखांचा महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र तीन वेळा ई-टेंडरिंग केल्यानंतरही त्यापैकी केवळ २७ घाटांचा लिलाव होऊ शकला. त्यातून प्रत्यक्षात २ कोटी २० लाखांचा महसूल शासनाला मिळाला. त्यामुळे यावर्षी किती घाट प्रत्यक्षात लिलावात जाणार आणि शासनाला किती महसूल मिळणार याबाबत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घाटांचा होणार लिलाव
गोंदिया तालुका- पुजारीटोला (कासा), डांगुर्ली, बनाथर, सतोना-१, महालगाव-२, किन्ही, तिरोडा तालुका- चांदोरी (बु), घाटकुरोडा-४, मांडवी, बिरोली, मुंडीपार, चांदोरी (खु), पिपरिया, घाटकुरोडा-२, अर्जुनी, आमगाव- पिपरटोला, ननसरी (मारबतघाट), बाम्हणी (गायकीघाट), घाटटेमणी-१, पदमपूर (मारबतघाट), मानेकसा, ननसरी-२, सावंगी (कुवाढास), महारीटोला-२, सडक अर्जुनी- कोरमारा, सावंगी-१, कोहळीटोला, बोथली, पिपरी-२, राका पळसगाव, वडेगाव, डोगरगाव खजरी, सौंदड-२, अर्जुनी मोरगाव- वडेगाव बध्या, गोरेगाव- बाघदेव तिल्ली, सालेकसा- दरबडा, देवरी- शिलापूर (ढिवरीनटोला),