३८ डॉक्टरांना अद्याप रूजू केले नाही
By admin | Published: July 27, 2014 11:48 PM2014-07-27T23:48:23+5:302014-07-27T23:48:23+5:30
मॅग्मो संघटनेच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातील ३८ डॉक्टरांना कार्यमुक्त केले होते. त्या डॉक्टरांना संप मिटल्यावरही परत कामावर घेण्यात आले नाही.
संपाला पाठिंबा दिल्याची शिक्षा : शालेय आरोग्य तपासणी बंद
गोंदिया : मॅग्मो संघटनेच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातील ३८ डॉक्टरांना कार्यमुक्त केले होते. त्या डॉक्टरांना संप मिटल्यावरही परत कामावर घेण्यात आले नाही. पंधरवड्यापासून कार्यमुक्त झालेले ते ३८ डॉक्टर मानसिक तणावात आहेत.
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत जुलै २००८ मध्ये ८८० डॉक्टरांची ११ महिन्यांसाठी करार तत्वावर नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०१३ मध्ये आणखी एक हजार २७० डॉक्टरांची नेमणूक केली. राज्यात २ हजार १७० कंत्राटी डॉक्टर शालेय आरोग्य तपासणीसाठी नियुक्त आहेत. शाळा, आंगणवाडी येथील बालकांची तपासणी केल्यानंतरही ते रूग्णालयात सेवा देतात. या तपासणीसाठी या डॉक्टरांना अनेकदा वाहनं उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते स्वत:च्या खर्चातून गाड्या भाड्याने घेऊन तपासणीसाठी जातात. यासाठी त्यांच्या मानधनात आठ टक्क्याने वाढ झाली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. तरीही हे डॉक्टर नियमितपणे काम करतात. राज्यात १ जुलैपासून राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनाने (मॅग्मो) बेमुदत संप सुरू केला. त्याला या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील डॉक्टरांनी पाठिंबा दिला. आठ टक्के मानधनात वाढ द्यावी या मागणीला त्यांनी धरून सामुदायिक रजा आंदोलन केले. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढण्यात आले. या कारवाईत राज्यातील ५४४ डॉक्टरांचा समावेश असून गोंदिया जिल्ह्यातील ३८ जणांचा समावेश आहे. आपल्या मागणीसाठी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देणे ही बाब त्यांच्या रोजगारावर बेतली आहे. ज्या मॅग्मो संघटनेला पाठिंबा दिला त्या संघटनेने आपलाच विचार करून या डॉक्टरांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर टाकला.
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात १० डॉक्टर, आमगाव ग्रामीण रूग्णालयात चार, उपजिल्हा रूग्णालय तिरोडा येथे चार, गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात चार, सडक/ अर्जुनी ग्रामीण रूग्णालयात चार, अर्जुनी/मोरगाव ग्रामीण रूग्णालयात चार, सालेकसा ग्रामीण रूग्णालयात दोन, देवरी ग्रामीण रूग्णालयात चार व आश्रम पथकात दोन डॉक्टर आहेत. या ३८ डॉक्टरांना कार्यमुक्त केल्यामुळे बालकांची तपासणी थांबलेली आहे. ज्या संपाला या डॉक्टरांनी पाठिंबा दिला त्या मॅग्मोने यांना रूजू करण्यापूर्वी आपला सनप मागे घेतला कसा? यात मॅग्मोचे वरिष्ठ अधिकारी मॅनेज तर झाले नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)