रोपवाटिकेत ३.८४ लाख रोपांची निर्मिती

By admin | Published: June 30, 2016 01:49 AM2016-06-30T01:49:28+5:302016-06-30T01:49:28+5:30

वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे विविध प्रकारच्या रोपांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे.

3.84 lakh seedlings in the nursery | रोपवाटिकेत ३.८४ लाख रोपांची निर्मिती

रोपवाटिकेत ३.८४ लाख रोपांची निर्मिती

Next

फुलली रोपवाटिका : १ जुलैच्या वनमहोत्सवासाठी सज्ज
अर्जुनी मोरगाव : वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे विविध प्रकारच्या रोपांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे. रोपवाटिकेत उभे असलेले ताजेतवाने रोपे पाहून क्षणभर आपण एखाद्या नंदनवनाशी समरूप झाल्याचा भास होतो. वनविभागाने फुलविलेली रोपवाटिका निश्चितच आल्हादायक ठरणारी आहे. या रोपवाटिकेत ३ लाख ८३ हजार ६०० रोपांचे संवर्धन करण्यात आले आहे.
सहा हेक्टरच्या परिसरात असलेली रोपवाटिका आज हिरवीकंच वसुंधरा दिसून येत आहे. ती येत्या १ जुलै रोजी आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी सज्ज असून १ लाख ६६ हजार ५७५ रोप विविध ठिकाणी जाणार आहेत.
येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने ७ किमी अंतरावर असलेल्या मालकानपूर येथे मध्यवर्ती रोपवाटिका आहे. सदर रोपवाटिका ६ हेक्टरमध्ये पसरली आहे. अर्जुनी ते महागाव मार्गावरील ऐन रस्त्याजवळ असल्याने ये-जा करणाऱ्यांचे मन प्रफुल्लीत होऊन बहरून जाते. रस्त्यालगतच्या वनसंपदेने खरा निसर्गाचा आस्वाद मनाला हेलावून जातो. मध्यवर्ती रोपवाटिकेची जबाबदारी सांभाळणारे क्षेत्र सहायक के.आर. राठोड यांनी सांगितले की, अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत मालकनपूर येथील मध्यवर्ती रोपवाटिका एकमेव आहे. सहा हेक्टर परिसरात विविध प्रजातींचे स्वत:च बीज संकलन करून रोपांची निर्मिती केली जात असल्याचे सांगितले.
रोपवनात सध्या उभी असलेले रोपे जवळपास ५ ते ६ महिन्यांचे आहेत. रोपांची झालेली वाढ पाहता उभे असलेली झाडे सर्वसामान्यांच्या नजरेत भरणारे दिसतात. सदर रोपवाटिकेत विविध रोपांची निर्मिती करून वनविभागासह इतर यंत्रणेला पुरवठा करण्याचे काम आहे.
विस्तीर्ण अशा जागेमध्ये आजघडीला सागवन ५९ हजार ८०० रोपे, आवळा ४८ हजार ६००, आंजन ६८ हजार, बांबू ३० हजार, जांभुळ २७ हजार ५००, कडूनिंब १७ हजार, पांढरा शिरस १४ हजार, शिसू १७ हजार, खैर १५ हजार, मोवा १८ हजार, अमलताज २ हजार, बकान १ हजार ५००, बीजा १ हजार ५००, कवट ३ हजार ९००, कुसुम १ हजार ५००, सिंथूर ५००, चिंच १५ हजार, मेकसिंग एक हजार, सीवज ३ हजार, रिठा २ हजार ५००, हिरणडा १ हजार, भेहडा १ हजार, सीताफळ ७ हजार, किनी २ हजार, बेल २६ हजार, करण ३ हजार, तेंदू १ हजार, रोमल ४ हजार, केश १ हजार ५००, बोर २ हजार अशा ३० प्रजातींच्या ३ लाख ८३ हजार ६०० रोपांनी रोपवाटिका फुलली आहे.
शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपण लागवडीसाठी अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात ३० हजार ८००, गोठणगाव २ हजार ५००, सडक अर्जुनी ८३ हजार २७५ व इतर यंत्रणेसाठी ५० हजार रोपांचा पुरवठा करण्यासाठी रोपवाटिका सज्ज झाली आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची उचल करण्याच्या कामाला गती आल्याचे दिसून येत आहे. रोपवाटिका फुलविण्यासाठी जिल्हा उपवनसंरक्षक रामगावकर, प्रोडीसीएफ राहुल पाटील, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे, वनपरि क्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात मालकनपूरची मध्यवर्ती रोपवाटिका सजलेली आहे. सध्या सागवान रोपांची निर्मिती करण्यासाठी ५०० बेड तयार करण्यात येत आहेत. सर्वांना रोपे मिळतील, असे क्षेत्रसहायक के.आर. राठोड यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 3.84 lakh seedlings in the nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.