३८३ प्रकल्पग्रस्तांसाठी ३८.४३ कोटींचे पॅकेज
By admin | Published: July 10, 2017 12:41 AM2017-07-10T00:41:16+5:302017-07-10T00:41:16+5:30
तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून ...
बोर्डाच्या बैठकीत विषय लागला मार्गी : उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून यासाठी ३८.४३ कोटींच्या पॅकेजला मंजुरी मिळाली आहे. बोर्डाच्या १७५ व्या बैठकीत हा विषय निकाली लागला.
बिरसी विमानतळ विस्तारीकरणासाठी प्राधीकरणने ग्राम परसवाडा, झिलमीली, कामठा व बिरसी या गावातील अनेकांची शेती व घरांचे अधिग्रहण केले होते. या प्रकल्पग्रस्तांनी योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन देऊनही तत्कालीन कॉंग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात काहीच मदत केली नाही. दरम्यान सन २०१४ मध्ये केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाच्या विषयाशी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून खासदार नाना पटोले यांना अवगत करविले.
प्रकल्पग्रस्तांचा हा गंभीर विषय असल्याने खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला घेऊन दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या पुढे मांडला होता. यावर नामदार सिन्हा यांनी भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे के. सुधाकर यांच्याशी चर्चा करून हे प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. तर याच विषयाला घेऊन नामदार सिन्हा यांच्यासोबत २९ मार्च रोजी खासदार पटोले, बिरसी विमानतळ अधिकारी रेड्डी व येथील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीतच नामदार सिन्हा यांच्याकडून पॅकेज मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या बैठकीच्या आधारावर ६ जून रोजी बोर्डाच्या १७५ व्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला व ३८.४३ कोटींच्या या पुनर्वसन पॅकेजच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. याबाबत भारतीय विमानपत्तन प्राधीकरणचे निर्देशक संदीप पिंपळापुरे यांनी तसे पत्र काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.