३८५८ कोरोना चाचण्या अन् पाॅझिटिव्ह केवळ १३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:05+5:302021-06-09T04:37:05+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरायला लागली आहे. बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने कोरोना ...
गोंदिया : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरायला लागली आहे. बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०५ वर आली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. ७) आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन अशा एकूण ३८५८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर मागील दोन दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण दगावला नाही. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
मे महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली आहे, तर जून महिन्यात बाधितांची संख्या बरीच कमी झाली. त्यामुळे कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी रेट २ टक्केच्या आतच आहे, तर ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या सुद्धा आता ३ टक्केच आहे. त्यामुळेच गोंदियाचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश झाला. परिणामी जिल्ह्यातील सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सर्वच व्यवहार अनलॉक झाल्याने व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी जिल्ह्यात ४१ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १३ नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १७१३०० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६८८१० नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १६८८१० नमुने तपासणी करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात ४०९६० कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी ३९९६२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३०५ काेरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
..............
दररोज साडेचार हजारांवर नागरिकांचे लसीकरण
काेरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वाचे शस्त्र आहे. आतापर्यंत २ लाख ८१ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात २ लाख १६ हजार नागरिकांना पहिला, तर ६५७६१ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दररोज साडेचार हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
..............
निर्बंध शिथिल झाले, कोरोना नव्हे
सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले आहे. अनलॉक करताच पुन्हा नागरिक रस्त्यांवर आणि बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याकडे दुलर्क्ष करीत आहेत. जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे गेला या आविर्भावात नागरिक वावरत आहेत. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसून, आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.