गणवेशांचे ३.९ कोटी खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 09:31 PM2017-11-05T21:31:10+5:302017-11-05T21:33:00+5:30
प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली. यंदापासून गणवेशाची रक्कम विद्यार्थी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यात देण्याचा निर्णय झाला. यांतर्गत जिल्ह्यातील ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी ३ कोटी ९ लाख ५२ हजार ८०० रूपये शासनाने दिले. जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाने मुख्याध्यापकांच्या खात्या ही रक्कम टाकली. परंतु शंभर टक्के विद्यार्थ्यांनी गणवेश घेतले किंवा नाही ही बाब गुलदस्त्यात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व श्रीमंत-गरीब असा भेदभाव नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची योजना शासनाने सुरू केली. शाळेत सर्व विद्यार्थी गणवेशात यावे यासाठी शासनाने वर्षातून दोन गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा पायंडा रचला. वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश देण्याचे नियम तयार केले.
विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश देण्यासाठी गणवेशाची रक्कम शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली. यापूर्वी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मिळून गणवेश खरेदी करीत होते. यात एक जोड गणवेशासाठी २०० रूपये असे दोन जोडसाठी ४०० रूपये एका विद्यार्थ्याच्या मागे शाळेला मिळत होते. परंतु गणवेशातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या झळकत असल्याने ही बाब शासनाच्या लक्षात आली.
सन २०१७-१८ या सत्रातील ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेश देण्यासाठी ३ कोटी ९ लाख ५२ हजार ८०० रूपये शासनाने दिले. यंदा शासनाकडून गणवेशाची व्यवस्था पालकांनीच करावी असे ठरविले. गणवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आई किंवा पालकांसह असलेल्या संयुक्त खात्यात गणवेशाचे ४०० रूपये टाकले गेले. गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ च्या ४२ हजार ५८५ मुली, अनुसूचित जातीची ४ हजार ७७९ मुले, अनुसूचित जमातीची ६ हजार ६६५ मुले व दारिद्रय रेषेखालील २३ हजार ३५३ मुले अशा एकूण ७७ हजार ३८२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन जोड गणवेश सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी द्यायचे होते. पैसे तर जिल्हा परिषदेकडून देण्यात आले. परंतु सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केले किंवा नाही ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे.