वर्षभरात ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:19 AM2018-06-04T00:19:27+5:302018-06-04T00:19:27+5:30
जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील व आदिवासी भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याविषयक काळजी घेताना दिसत नाही. शहरातही काही प्रमाणात हेच वातावरण असून परिणामी सन २०१७-१८ या वर्षभरात शून्य ते १ वर्षातील ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. यावरून शून्य बालमृत्यू अभियानाचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात ४७ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तिरोडा तालुक्यातील ग्रामीण भागात १८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ३८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सालेकसा तालुक्यातील ग्रामीण भागात १३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात ५ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागात २० चिमुकल्यांचा तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात १४ चिमुकल्यांचा मृत्यू झाला झाला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांत वर्षभरात १६३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु तिरोडा व गोंदिया या दोन शहरांत चिमुकल्यांच्या मृत्यूची आकडेवारी सर्वाधीक आहे. येथे २२८ चिमुकल्यांचा वर्षभरात मृत्यू झाला असून ग्रामीण भागापेक्षा दुप्पट मृत्यू शहरी भागात झाले आहे. यात येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सर्वाधीक चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्याचा बालमृत्यू दर २२.२० टक्के
जिल्ह्यातील गर्भवती महिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे बालमृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात १७ हजार ९०० महिलांची प्रसूती करण्यात आली. यातील १७ हजार ६१६ बाळ सुखरूप आहेत. तर ३९१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून हा दर २२.२० टक्के आहे. शासनाने शून्य माता व बालमृत्यू अभियान सुरू केले. परंतु या अभियानाची उत्तम अंमलबजावणी न झाल्यामुळे बालमृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
आहाराकडे दुर्लक्ष
गर्भावस्थेत महिलांना संतुलीत आहार दिला जात नाही. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणी होत नसल्यामुळे महिलांच्या पोटात असलेले अर्भक कुपोषीत होतात. त्यामुळे कमी वजन व शरीराची योग्यरित्या वाढ न झाल्यामुळे अर्भक मृत्यूदर वाढत आहे. बाल विकास विभागातर्फे दिला जाणारा आहार चवीष्ट नसल्यामुळे महिला मंडळी तो आहार जनावरांना देत असल्याची माहिती आहे.
वांगाभातमुळे वाढतेय कुपोषण
गोंदिया जिल्हा आदिवासी असल्यामुळे येथील लोक पाहिजे त्या प्रमाणात आरोग्याची काळजी घेत नाही. गर्भवती महिला वांगे, आळण, कढी अशा एकेरी भाज्यांवरच दिवस काढतात. अनेक महिलांना गर्भावस्थेच्या पूर्ण काळात पोळी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे वजन सुरूवातीपासून कमीच असते. त्यातून कुपोषण वाढत आहे.