३९२ पर्यटकांनी केली जंगल सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:12+5:302021-02-14T04:27:12+5:30
कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : नागरिकांचा वन पर्यटनाकडे कल वाढावा, वनांचे महत्त्व समजावे, तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाप्रती ...
कपिल केकत (लोकमत विशेष)
गोंदिया : नागरिकांचा वन पर्यटनाकडे कल वाढावा, वनांचे महत्त्व समजावे, तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाप्रती आवड निर्माण व्हावी या उद्देशातून वन विभागाने येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रवेशावर ५० टक्के सूट दिली होती. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून १४ दिवसांच्या या विशेष सवलतीचा ३९२ पर्यटकांनी लाभ घेत जंगल सफारी केली आहे.
माणूस आज आपल्या हव्यासापोटी जंगल नष्ट करून तेथे सिमेंट काँक्रीटचे जंगल तयार करीत आहे. मात्र, पर्यावरणाशी केलेली ही छेड काहीना काही नैसर्गिक आपत्तींमधून माणसाला धडा शिकवीत आहे. अशात पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही अत्यावश्यक बाब असून, याशिवाय आता पर्याय नसल्याचे निसर्ग दाखवून देत आहे. विशेष म्हणजे, ही बाब आता कित्येकांच्या लक्षात आली असून सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात कोंडल्याने मोकळा श्वास घेण्यासाठी त्यांची जंगलाकडे धाव सुरू झाली आहे. हेच कारण आहे की, आपला सुटीचा काळ घालविण्यासाठी नागरिकांचा कल शहरांकडे न दिसता जंगलाकडे दिसून येत आहे. वन विभागालाही पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी नागरिकांच्या या सहकार्याची गरज आहे. यातूनच कोरोना लॉकडाऊननंतर आता वन पर्यटनाला परवानगी मिळाल्याने वन विभागाने येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी ५० टक्के विशेष सवलत दिली होती. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून २६ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान ही सवलत देण्यात आली होती. यांतर्गत ३९२ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली असून, जंगल सफारी केली आहे.
----------------------------
२८ हजारांचा मिळाला महसूल
वन पर्यटनातून महसूल मिळवून घेणे हा वन विभागाचा उद्देश कधीच राहिलेला नाही. उलट निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्याचा आनंद व अनुभव घेऊन पर्यावरणाचे महत्त्व प्रत्येकाला पटावे यासाठी वन पर्यटनाला परवानगी दिली जाते. यातूनच वन विभागाने कोरोनामुळे वैतागून गेलेल्या नागरिकांना तेवढाच विरंगुळा म्हणून प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून वन विभागाने व्याघ्र प्रकल्पात प्रवेशावर ५० टक्के सवलतीची सूट दिली होती. यांतर्गत ३९२ पर्यटकांनी ७८ वाहनांनी प्रवेश केला. यामध्ये वन विभागाला २८ हजार १५० रुपयांचा महसूल मिळाला आहे.