३९६ नामांकन छाननीत ठरले वैध
By admin | Published: October 10, 2015 02:18 AM2015-10-10T02:18:55+5:302015-10-10T02:18:55+5:30
चार नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुदतीअखेर ४६२ नामांकन दाखल झाले होते.
६६ कटले : १९ पर्यंत माघारीची मुदत
गोंदिया : चार नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुदतीअखेर ४६२ नामांकन दाखल झाले होते. शुक्रवारी त्या अर्जांची छाननी केल्यानंतर ६६ अर्ज बाद झाले. त्यामुळे ३९६ अर्ज वैध ठरले आहे.
वैध ठरलेल्या अर्जांचा विचार करता आता सर्वाधिक १२३ अर्ज देवरीत आहेत. येथे १२५ पैकी केवळ २ अर्ज बाद ठरले. अर्जुनी मोरगाव येथे १३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३६ बाद झाले तर काही उमेदवारांनी डबल अर्ज केले होते. त्यामुळे आता ९० उमेदवार पात्र ठरले आहेत. गोरेगाव येथे १११ पैकी १२ अर्ज बाद ठरून ९९ उमेदवार पात्र ठरले आहेत तर सडक अर्जुनी येथे ९५ पैकी ११ अर्ज बाद ठरल्याने ८४ उमेदवार निवडणूक लढण्यास पात्र ठरले आहेत.
१९ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. यानंतर शिल्लक राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)
ढाब्यात आढळली दारू व रॉकेल
गोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत गणखैरा परिसरात असलेल्या प्रेम ढाबा येथे एका डबकीत रॉकेल व अवैधरीत्या दारू साठवून ठेवणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सदर कारवाई गुरूवारच्या सायंकाळी ७.४५ वाजतादरम्यान परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक मंदार जवळे यांनी केली आहे. या प्रकरणात आरोपी लंकेश्वर रामदास सौंदरकर (२२) रा. पालेवाडा, अशोक चैनलाल दवारे रा. गोंदिया व परमेश्वर ऊर्फ प्रेम तुळशीराम कांबळे (३०) रा. गणखैरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्या ढाब्यामध्ये २४ नग देशी दारूचे पव्वे, मॅकडाल व्हिस्कीचे १४ पव्वे, रॉयल स्टगचे सहा पव्वे, व्हाईटमिस्चीपचे तीन पव्वे, हायबर्षचे नऊ नग, १८ देशी दारूच्या बॉटल, इतर विदेशी दारू व १४ लिटर रॉकेल जप्त करण्यात आले. आरोपींविरूध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३,४ जीवनावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई ७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)