४ कोटींचे क्रीडा संकुल कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:23 AM2019-03-07T00:23:29+5:302019-03-07T00:24:23+5:30

महाराष्ट्र शासनाने तालुका तेथे क्रीडा संकुल या योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक असे आठ तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी आठ कोटी रूपये मंजूर केले. आठही तालुक्यात मागील पाच वर्षापासून उभारण्यात आलेले चार क्रीडा संकुल आजघडीला कवडी मोलाचे नाहीत.

4 crore sports complexion worthless | ४ कोटींचे क्रीडा संकुल कवडीमोल

४ कोटींचे क्रीडा संकुल कवडीमोल

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन वर्षात ३ संकुलाचे लोकार्पण : चार तालुका क्रीडा संकुल अद्यापही कुलूपबंद

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने तालुका तेथे क्रीडा संकुल या योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक असे आठ तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी आठ कोटी रूपये मंजूर केले. आठही तालुक्यात मागील पाच वर्षापासून उभारण्यात आलेले चार क्रीडा संकुल आजघडीला कवडी मोलाचे नाहीत. प्रत्येक क्रीडा संकुलावर एक कोटी रूपये खर्च करण्यात आले.परंतु आजही चार क्रीडा संकुल कुलूपबंद आहेत. त्या क्रीडा संकुलाचा कवडीचा फायदा खेळाडूंना होत नाही.
विद्यार्थ्यांचा शारीरीक विकास व्हावा, खेळातून त्यांनी उंच शिखर गाठावे म्हणून महाराष्ट्र शासनाने २००१ ला क्रीडा धोरण ठरवून विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात २६ मार्च २००३ ला पहिला शासन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २१ मार्च २००९ ला काढलेल्या शासन निर्णयात दुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर १९ सप्टेंबर २०१४ ला तिसरे शासन निर्णय काढण्यात आला. वर्षभरात क्रीडा संकुलाचे बांधकाम करावे असेही सूचविण्यात आले होते. प्रत्येक तालुका क्रीडा संकुलावर एक कोटी रूपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. परंतु पाच वर्षापासून तयार करण्यात आलेल्या क्रीडा संकुलांच्या लोकार्पणासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधींना वेळच मिळाला नाही.त्यामुळे या क्रीडा संकुलांचे लोकार्पण होऊ शकले नाही. तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल एक कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. परंतु ते तालुक्यातील खेळाडूंसाठी खुलेच करण्यात न आल्यामुळे कोट्यवधीचे क्रीडा संकुल आजघडीला खेळाडूंसाठी कवडीमोल ठरत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी, देवरी गोंदिया अशा आठ ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यात आले होते. यासाठी आठ कोटी रूपये खर्च करण्यात आले.
या क्रीडा संकुलाच्या संरक्षण भिंतीसाठी लाखोच्या घरातील निधी खर्च करण्यात आला. कुण्या क्रीडा संकुलावर २० लाखातून तर काही क्रीडा संकुलावरील संरक्षण भिंतीवर ३० लाख रूपये खर्च करून त्या-त्या क्रीडा संकुलाची सुरक्षा भिंत उभारण्यात आली. खेळाचे मैदान, जीमखाना, २०० मीटरचा ट्रॅक, विविध खेळाचे मैदान व साहित्य या क्रीडा संकुलात उभारण्यात आले. परंतु पाचवर्ष लोटूनही या क्रीडा संकुलांना खेळाडूंच्या स्वाधीन करण्यात आले नाही.
गोंदिया तालुक्याच्या क्रीडा संकुल कामठा येथे असून सर्वात आधीच याचे लोकार्पण झाले. परंतु सात तालुक्यातील क्रीडा संकुलांना लोकार्पणाची प्रतीक्षा होती.
यासंदर्भात गावागावातील खेळाडूंचा जोर व वृत्तपत्रांमध्ये अधून-मधून झळकणाऱ्या बातम्या पाहून फक्त तिरोडा, सडक-अर्जुनी, देवरी या तीन तालुक्यातील क्रीडा संकुलाचे लोकार्पण सन २०१९ मध्ये करण्यात आले. परंतु आमगाव, सालेकसा, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव या चार तालुक्यातील क्रीडा संकुलांचे लोकार्पण करण्यात आले नाही.
एकाच जिल्ह्यात एकाच वेळी उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलांपैकी तिन क्रीडा संकुलांचे लोकार्पण करण्यात आले. चार क्रीडा संकुलांचे लोकार्पण करण्यात आले नाही. ४ कोटी रूपयातून उभारण्यात आलेले हे चार क्रीडा संकुल आजघडीला खेळाडूंसाठी कवडीचे नाहीत असा सूर येत आहे.

जिल्हा व ६ तालुका क्रीडा अधिकारी नाहीत
जिल्हा क्रीडा अधिकारी हे पद रिक्त आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यासाठी आठ तालुका क्रीडा अधिकारी हवे असताना केवळ दोनच तालुका क्रीडा अधिकारी आहेत. सुभाष गांगरेड्डीवार यांना गोंदिया तालुका असून त्यांच्यावर जिल्हा क्रीडा अधिकारी हे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आले. तसेच आमगाव, सालेकसा, गोरेगाव व अर्जुनी-मोरगाव ही चार तालुके देण्यात आले. त्यामुळे ते एक ना धड भाराभर चिंध्या अशा अवस्थेत गोंदिया जिल्ह्याचे काम करीत आहेत.एकट्या शिंदे यांच्या भरवशावर गोंदिया जिल्ह्याचा क्रीडा विभाग कसा चालणार आहे. तरी देखील शिंदे क्रीडा कामाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन फिरत आहेत.

Web Title: 4 crore sports complexion worthless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.