संशयास्पद स्थितीत आढळलेल्या तरुणाजवळून ४ मोबाइल जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:23+5:302021-09-04T04:34:23+5:30
गोंदिया : येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी एका संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाजवळून ७० हजार रुपये किमतीचे चार ॲण्ड्रॉइड मोबाइल ...
गोंदिया : येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी एका संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाजवळून ७० हजार रुपये किमतीचे चार ॲण्ड्रॉइड मोबाइल जप्त केले. दीपक खेमराज सयाम (१९, रा. पलखेडा, ता. गोरेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रवाशांचे साहित्य चोरीला जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या तपासासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्त घालत असताना २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता गोंदिया यार्ड डेमो शेडजवळ एक तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना या चोरीसंदर्भात माहिती दिली. रेल्वे प्रवासी साखरझोपेत असताना त्यांचा मोबाइल आपण चोरत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आरोपीला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फौजदारी कलम ४१ (१) (ड) अन्वये कारवाई केली आहे. ही कारवाई निरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक के. के. दुबे, मुख्य आरक्षक आर. सी. कटरे, निरीक्षक नंद बहादूर यांच्या टास्क चमूने केली.