वर्षभरात ४ वसतिगृहांना मिळाली हक्काची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:43 AM2019-01-20T00:43:56+5:302019-01-20T00:45:36+5:30
विशेष समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व राहण्याची सोय व्हावी म्हणून जिल्ह्यात आठ वसतिगृह उभारण्यात आले आहे. परंतु वर्षानुवर्षे भाड्याच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहांतील ६ वसतिगृहांना स्वतच्या हक्काची जागा मिळाली आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विशेष समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व राहण्याची सोय व्हावी म्हणून जिल्ह्यात आठ वसतिगृह उभारण्यात आले आहे. परंतु वर्षानुवर्षे भाड्याच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहांतील ६ वसतिगृहांना स्वतच्या हक्काची जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे, या वर्षभरात यातील चार वसतिगृहांना स्वत:ची जागा मिळाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचीत जमातीतील हजारो विद्यार्थी या वसतिगृहात राहून शिक्षण घेतात. वर्षानुवर्षापासून हे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत होते. घरमालकाने इमारत सोडण्यात सांगितले तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वसतिगृहाचे साहित्य हलवावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होत होते. परंतु आता या आठ पैकी सहा वसतिगृहांना हक्काची जागा मिळाली आहे. उर्वरीत दोन वसतिगृहांना जागा मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
सुरूवातीला गोंदियातील मुले व मुलींचे वसतिगृह या दोनच वसतिगृहांकडेच स्वत:ची जागा होती. तर सहा वसतिगृहांना भाड्याच्या इमारतीतूनच चालवावे लागत होते. परंतु पालकमंत्री राजकुमार बडोले हे सामाजिक न्याय मंत्री असल्याने त्यांनी याकडे विशेष लक्ष घालून हक्काची जागा नसलेल्या सहा पैकी चार वसतिगृहांना जागा मिळवून दिली आहे. यात, अर्जुनी-मोरगाव येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सडक-अर्जुनी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व तिरोडा येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला हक्काची जागा मिळवून देण्यात आली आहे. वनविभाग व महसूल विभागाच्या जागेवर हे वसतिगृह उभारण्यात येत आहे.
वर्षभरात वसतीगृह ०.९८ हे.आर जागेत तयार करण्यात येणार आहे. या प्रत्येक वसतिगृहासाठी एवढी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देवरी व कुडवा येथील वसतिगृहांचा प्रश्न सुटणार
गोंदिया जिल्ह्यातील आठ पैकी सहा वसतिगृहांना हक्काची जागा मिळाली आहे. परंतु देवरी येथील मुलींच्या वसतिगृहासाठी वनविभागाची जागा मागीतली जात असून त्यासाठी वनविभागाची कार्यवाही सुरू आहे. तर लगतच्या ग्राम कुडवा येथील नवीन वसतिगृहाला महसूल विभागाची जागा मिळवून देण्यासाठीही प्रक्रिया सुरू आहे.
निवासी शाळाही स्वत:च्या जागेवर
अर्जुनी-मोरगाव येथील निवासी शाळेला हक्काची जागा असावी यासाठी नामदार बडोले यांनी प्रयत्न करून जागा मिळवून दिली. बहुतांश जागा वनविभागाची असून मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी असलेल्या निवासी शाळा व वसतिगृहाच्या उत्थानासाठी उपवनसंरक्षकांनी विशेष सहकार्य केल्यामुळे विशेष समाज कल्याण विभाग वनविभागाच्या अधिकाºयांचा गौरव करणार आहे.
भाड्याच्या इमारतीत असलेल्या ४ वसतिगृह व एक निवासी शाळेला हक्काची जागा मिळाली आहे. उर्वरतीत दोन वसतिगृहांचा जागेच्या प्रश्नांसंदर्भात कार्यवाही सुरू असून हा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
-मंगेश वानखेडे
विशेष समाज कल्याण अधिकारी, गोंदिया.