जिल्ह्यातील ४ तालुके झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:20 AM2021-07-20T04:20:54+5:302021-07-20T04:20:54+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. परिणामी आता जिल्ह्यात ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे. परिणामी आता जिल्ह्यात फक्त १२ सक्रिय रुग्ण उरले असून जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव हे ४ तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. उरलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये ५ रुग्ण इतर राज्य व जिल्ह्यातील आहेत. मात्र, असे असतानाही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला होता. परिणामी सक्रिय रुग्ण संख्या ४१ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, आता दुसरी लाट ओसरली असून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. यामुळेच आता दररोज निघणारी बाधितांची संख्याही बोटावर मोजण्याइतपत आली आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत १२ सक्रिय रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. यातही ५ रुग्ण इतर राज्य व जिल्ह्यातील आहेत. यामुळे आता दिलासादायक स्थिती आहे.
शिवाय रुग्ण संख्या नियंत्रणात असल्यामुळे जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव हे ४ तालुके कोरोनामुक्त झाले आहे. तर गोंदिया तालुक्यात १, तिरोडा तालुक्यात २, आमगाव तालुक्यात ३ व सालेकसा तालुक्यात १ सक्रिय रूग्ण उरला आहे. म्हणजेच जिल्ह्यातील फक्त ७ रुग्ण सक्रिय आहेत. यावरून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
------------------------
तिरोडा तालुक्यात कोरोनाची पुन्हा एंट्री
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुमारे १५ दिवस कोरोनामुक्त असलेल्या तिरोडा तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने एंट्री केली आहे. यामुळेच तिरोडा तालुक्यात २ सक्रिय रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. हाच प्रकार जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यांत घडला आहे. म्हणजेच, कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांना अधिकच खबरदारी घेण्याची गरज दिसून येत आहे.
------------------------------
उतावळेपणा न करता नियमांचे पालन गरजेचे
जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न व जिल्हावासीयांच्या सहकार्यामुळेच जिल्ह्यातील स्थिती आता नियंत्रणात असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होणार यात शंका वाटत नाही. मात्र, असे असतानाही तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. यामुळे नागरिकांनी उतावळेपणा न करणेच गरजेचे असून जिल्ह्याला तिसऱ्या लाटेपासून मुक्त ठेवण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.