गार्डनमध्ये खेळत असताना घात झाला; ४ वर्षीय चिमुकल्याने गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 06:25 PM2022-11-15T18:25:06+5:302022-11-15T18:35:56+5:30
नवेगाव बांधच्या हिलटॉप गार्डनमधील घटना
गोंदिया : पर्यटनास गेल्यानंतर उत्साहाच्या भरात अनेकजण हरवून जातात. मात्र, असा निष्काळजीपणा खूपदा महागात पडू शकतो. नवेगाव बांध येथे अशीच एक ह्रदयद्रावक घटना घडलीये. येथील हिल टॉप गार्डनमध्ये खेळता-खेळता ४ वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला.
सफल होमानंद नंदनवार (रा. अर्जुनी मोर) असे या चिमुकल्याचे नाव आहे. सफल आई स्नेहा नंदनवार व इतर ८-९ महिलांसह नवेगावबांध येथे पर्यटनाकरिता हिलटॉप गार्डनला आला होता. दरम्यान लहान-लहान मुले गार्डनमध्ये खेळत असतानाच सफल पाण्याच्या टाक्यात पडला. मुलांनी तत्काळ याबाबत जाऊन सांगितले. सफलला लगेच टाकीबाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
सफलच्या अचानक जाण्याची वार्ता तो रहात असलेल्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच सफलचे वडील होमानंद नंदनवार हे तातडीने अर्जुनीवरून नवेगाव बांधयेथील ग्रामीण रुग्णालयात आले. मृतकाच्या पाल्यांनी मात्र पोलिसात तक्रार द्यायचे टाळले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने नंदनवार कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लहान मुलांकडे दुर्लक्ष
फिल्टर गार्डन येथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे गार्डनमध्ये खेळणाऱ्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे अन्यथा असे दुर्दैवी घटना घडतच राहतील अशी चर्चा पर्यटन संकुल परिसरात पर्यटकांमध्ये होती. खबरदारीचा उपाय म्हणून हिल टॉप गार्डनच्या व्यवस्थापनाने योग्य त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.