मृतांच्या अंत्यसंस्कारावर पालिकेला ४० लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:32+5:302021-06-09T04:36:32+5:30
गोंदिया : देशात मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केला असून तेव्हापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सुमारे २०० ...
गोंदिया : देशात मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केला असून तेव्हापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या लाटेने अवघ्या देशासह जिल्ह्यात कहर केला. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील सुमारे ४५० नागरिकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. कोरोना ही आता राष्ट्रीय महामारी घोषित झाली असून संसर्गजन्य असलेल्या महामारीत कित्येक मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेहही स्वीकारले नाहीत. अशांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगर परिषदेने स्वीकारली असून त्यांच्यावरील अंत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च नगर परिषदेने आपल्या तिजोरीतून केला आहे.
यामध्ये काही जिल्ह्यातील तर काही अन्य जिल्हे व राज्यांतील मृतांचाही समावेश आहे. मात्र माणुसकी जपत कोरोनाने मरण पावलेल्या सर्वांच्या मृतदेहावर नगर परिषदेने अंत्यसंस्कार केले. यासाठी नगर परिषदेला ४० लाख रुपयांचा खर्च आला आहे. नगर परिषदेने आतापर्यंत ८०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यासाठी प्रत्येकी चार हजार रुपये खर्च नगर परिषदेला करावा लागला आहे. तर अंत्यसंस्कारासाठी नगर परिषदेने कंत्राट दिले होते. संबंधित कंत्राटदाराच्या कामगारांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
---------------------------
कोट
कोरोना ही महामारी असून यामुळे मरण पावलेल्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च नगर परिषदेने आपल्या तिजोरीतून केला आहे. आतापर्यंत ८०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यासाठी नगर परिषदेने ४० लाख रुपये खर्च केले आहेत. संपूर्ण व्यवस्था व्यवस्थितपणे करण्यात आली आहे.
- करण चव्हाण,
मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया
--------------------------
कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी नगर परिषदेकडे आहे. त्यांच्याच माध्यमातून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संपूर्ण व्यवस्था नगर परिषदेने सांभाळली आहे.
- डॉ. अमरीश मोहबे,
जिल्हा शल्य चिकिसक, गोंदिया
-----------------------------
कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली असून तसे आदेशच आहेत. त्यानुसार, नगर परिषद प्रशासन मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहे.
- राजेश खवले,
जिल्हाधिकारी, गोंदिया
------------------------
एका अंत्यसंस्काराचा खर्च चार हजार रुपये
नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत ८०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये नगर परिषदेच्या तिजोरीतून ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यात प्रत्येकी चार हजार रुपये एका अंत्यसंस्कारासाठी नगर परिषदेला खर्च आला आहे. यामध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकूड, डिझेल व अन्य खर्च येत होते.
---------------------------------
अंत्यसंस्कारासाठी दिले कंत्राट
नगर परिषदेने कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कंत्राट दिले होते. संबंधित कंत्राटदाराच्या कामगारांनी कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. रुग्णालयातून थेट मोक्षधाम येथे मृतदेह नेल्यावर तेथे कंत्राटदाराचे कामगार पूर्ण व्यवस्था करून ठेवते होते व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत होते. नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत असे ८०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.