अतिवृष्टीग्रस्तांसाठी ४० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:31 PM2018-04-12T21:31:04+5:302018-04-12T21:31:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव तालुक्यात २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागातर्फे सर्वेक्षण नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. शासनाने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या आपादग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी ४० लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला.
तालुक्यात २०१६ मध्ये पावसाळी अतिवृष्टीमुळे पिकांसह घरांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे १६५७ घरांची पडझड झाली होती. याचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल शासनाला पाठविला होता. मात्र नुकसान भरपाईचा निधी देण्यास शासनाकडून विलंब होत होता. आपादग्रस्तांना लवकर नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आ. संजय पुराम यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने आमगाव तालुक्यातील आपादग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी ४० लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करुन आमगाव तहसील कार्यालयाकडे पाठविला. नुकसान भरपाईची रक्कम आपदग्रस्तांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर या मदत निधीचे वाटप केले जाणार आहे.
आ. पुराम यांच्या पाठपुराव्यामुळे आपदग्रस्तांना लवकर निधी मिळण्यास मदत झाल्याने आपादग्रस्तांना समाधान व्यक्त केले.