४० गर्भवतींना केले नागपूर रेफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 05:00 AM2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:08+5:30

गर्भवती असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आली की तिच्यावर उपचार केला जात नाही. अधिक पैसे मोजून खासगी रूग्णालयातही तिची प्रसूती करण्याचा मानस असला तरी चक्क प्रसूतीला नकार दिला जातो. मात्र या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कोणतीही गर्भवती महिला असो त्यांचा कोविड तपासणी अहवाल हातात आल्याशिवाय प्रसूतीसाठी हात लावले जात नाही.

40 pregnant women referred to Nagpur | ४० गर्भवतींना केले नागपूर रेफर

४० गर्भवतींना केले नागपूर रेफर

Next
ठळक मुद्देसहा महिन्यात फक्त सात प्रसूती : कोविड असलेल्या गर्भवतींसाठी व्यवस्थाच नाही

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाल व माता मृत्यू शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणे सोडा, कोरोनाच्या नादात गर्भवतींची प्रसूती करणार नाही असा पवित्रा काही खासगी व सरकारी डॉक्टरांनी घेतल्यामुळे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवतींना नरक यातना भोगत नागपूरला रेफर केले जाते. मार्चपासून ते आतापर्यंत जिल्ह्यातून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या तब्बल ४० वर गर्भवतींना रेफर टू नागपूर केले आहे.
गर्भवती असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आली की तिच्यावर उपचार केला जात नाही. अधिक पैसे मोजून खासगी रूग्णालयातही तिची प्रसूती करण्याचा मानस असला तरी चक्क प्रसूतीला नकार दिला जातो. मात्र या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कोणतीही गर्भवती महिला असो त्यांचा कोविड तपासणी अहवाल हातात आल्याशिवाय प्रसूतीसाठी हात लावले जात नाही. गोंदिया येथे जिल्हा सामान्य रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई स्त्री जिल्हा रूग्णालय असताना या तीन ठिकाणांपैकी एकही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांसाठी प्रसूती केंद्र उभारण्यात आले नाही. एप्रिल महिन्यात नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रजेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात कोविड पॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसूती करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.परंतु या प्रसूतीसाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एकही प्रसूतीतज्ज्ञ गेला नसल्याने प्रसूती तज्ज्ञ म्हणून डॉ.आशा अग्रवाल, भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. सुप्रिया बोरकर या दोघांवरच भार देण्यात आला. परंतु अन्य रूग्णांनाही पाहता या ठिकाणातील डॉक्टर काम करून थकले परिणामी त्यांचीही प्रकृती खालावली. त्या ठिकाणी प्रसूती करायला एकही डॉक्टर नसल्याने कोविड पॉझिटिव्ह रूग्णांचे हाल होत आहेत. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्ह गर्भवतींना रेफर टू नागपूर केले जाते. मार्चपासून आतापर्यंत तब्बल ४० गर्भवतींना प्रसूतीसाठी नागपूरला रेफर करण्यात आले. परंतु आरोग्य विभाग फक्त १५ ते २० कोविड रूग्णांना रेफर केल्याची कबुली देत आहे.

फक्त ७ पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलांची प्रसूती करण्यासाठी रजेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात जे हॉस्पीटल तयार करण्यात आले. त्या आॅपरेशन थिएटरमध्ये आतापर्यंत फक्त सात कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करण्यात आली.त्यात पाच गर्भवतींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील दोन शस्त्रक्रिया डॉ.आशा अग्रवाल, दोन शस्त्रक्रिया डॉ.सायास केंद्र व एक प्रसूती डॉ.खंडेलवाल यांनी केली. तर दोन महिलांची सामान्य प्रसूती झाली. उर्र्वरित सर्व कोरोना पॉझिटीव्ह गर्भवतींना नागपूरला रेफर केले जात असते.

डॉक्टरांनाच रॅपिड अ‍ॅन्टीजेनची रिपोर्ट चालत नाही
प्रत्येक गर्भवतीला कोरोना चाचणी केल्याशिवाय उपचारासाठी घेतले जात नाही. परंतु कोरोना चाचणी करण्यासाठी शासनाने दोन चाचणी पद्धती पुढे आणल्या आहेत. त्यात एक रॅपिड अँटीजेन तर दुसरी आरटीपीसीआर ही चाचणी पध्दत आहे. रॅपिड अँटीजेन किटचा अहवाल निगेटीव्ह असला तरी त्या अहवालाला डॉक्टर मानत नसून आरटीपीसीआर या चाचणीचाच अहवाल दिल्याशिवाय गर्भवतींना उपचारासाठी हात लावले जात नाही. त्यामुळे अनेकांमध्ये गोंधळ आहे.

मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुढे येत आहे. कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची प्रसूती बीजीडब्ल्यू आणि रजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात केली जात नसून त्यांना थेट नागपूरला रेफर केले जात आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून याकडे मात्र आरोग्य विभागाच्या वरिष्ठांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
- गोपालदास अग्रवाल, माजी आमदार

Web Title: 40 pregnant women referred to Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.