जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र धोक्याची, तपासणी यंत्रणा सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:43+5:302021-01-17T04:25:43+5:30
गोंदिया : आरोग्य संस्थांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. जीवनदान देणाऱ्या आरोग्य संस्था रुग्णांना मृत्यूच्या दाढेत लोटत असतील तर यापेक्षा मोठे ...
गोंदिया : आरोग्य संस्थांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. जीवनदान देणाऱ्या आरोग्य संस्था रुग्णांना मृत्यूच्या दाढेत लोटत असतील तर यापेक्षा मोठे पाप नाही. गोंदिया जिल्ह्यातील ३१३ आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक ऑडिट अनेक वर्षांपासून झालेच नाही. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र ४० व उपकेंद्र २५८ अशा २९८ आरोग्य संस्थांचे ना फायर ऑडिट ना इलेक्ट्रिक ऑडिट झाले. जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत १० चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आरोग्य प्रशासन खळबळून जागे झाले. आता राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांनी फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २५८ उपकेंद्र आहेत. या संस्थांचे नियमित फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक आहे. परंतु फायर किंवा इलेक्ट्रिक ऑडिट झाले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरक्षेसाठी फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक असताना आरोग्य संस्थांचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या ४० प्राथमिक आरोग्य केंद्र,२५८ उपकेंद्राचे फायर किंवा इलेक्ट्रिक ऑडिट वर्षानुवर्षांपासून झाले नाही. ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक असे अग्निशमन यंत्र बसविण्यात आले. परंतु त्यांचे ऑडिट झाले नाही. २५८ उपकेंद्राचे फायर किंवा इलेक्ट्रिक ऑडिट सोडा त्यात साधे अग्निशमन यंत्रसुद्धा नाही. या ठिकाणी आग लागल्यास ती आग विझविण्यासाठी साधी उपाययोजनाही करता येणार नाही इतकी विदारक स्थिती गोंदिया जिल्ह्यात आहे.
तालुकानिहाय प्राथमिक आरोग्य केंद्र
आमगाव-४
सालेकसा-४
देवरी-४
गोंदिया-९
सडक-अर्जुनी-४
अर्जुनी-मोरगाव-६
तिरोडा-४
गोरेगाव-५
कोट
जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात ९८ अग्निशमन यंत्र बसविण्यात आले आहेत. परंतु अनेक वर्षांपासून प्राथिमक आरोग्य केंद्रांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट झाले नाही. आम्हाला यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पत्र दिले आहे.
डॉ. वेदप्रकाश चौरागडे
अतिरक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया