४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 10:09 PM2018-10-04T22:09:49+5:302018-10-04T22:10:10+5:30
प्लास्टिकबंदी विरोधात मोहिम कडक करीत नगर परिषदेने शहरातील एका कारखान्यावर धाड टाकून तेथून ४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. संबंधित व्यावसायिकावर ही दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आल्यामुळे या वेळी त्याला १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्लास्टिकबंदी विरोधात मोहिम कडक करीत नगर परिषदेने शहरातील एका कारखान्यावर धाड टाकून तेथून ४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. संबंधित व्यावसायिकावर ही दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आल्यामुळे या वेळी त्याला १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे, गुरूवारी (दि.४) दुपारी २ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुद्धा पथकात होते.
मागील काही दिवसांपासून प्लास्टीक बंदी विरोधी कारवाया बंद असल्याने शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढू लागला होता. याची दखल घेत नगर परिषदेने सोमवारपासून (दि.२) पुन्हा प्लास्टिक बंदी विरोधी मोहिम सुरू केली. यांतर्गत पथकाने शहरातील सहा व्यापाऱ्यांवर कारवाई करीत ३० हजार रूपयांचा दंड ठोठावला होता. तसेच त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या व थर्माकोल साहित्य जप्त केले होते.
बुधवारीही पथकाने कारवाई केली होती. एवढ्यावरच न थांबता पथकाने गुरूवारी (दि.४) दुपारी २ वाजता जवळील ग्राम कारंजा येथील प्रकाश प्रोव्हीजन्स या कारखान्यावर धाड टाकली.
या धाडीत पथकाने कारखान्यात ४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. तर या व्यापाऱ्यावर ही दुसऱ्यांदा कारवाई असल्याने पथकाने त्याला १० हजार रूपयांचा दंड ठोठावला.
नगर परिषदेने केलेल्या गुरूवारच्या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी महेश भिवापूरकर व अर्जुन राठोड हे सुद्धा सहभागी झाले होते.
तर त्यांच्या सोबत नगर परिषद कर्मचारी नगर परिषद अभियंता उमेश शेंडे, सुमेध खापर्डे, आरोग्य निरीक्षक मुकेश शेंदे्र, मनिष बैरिसाल, देवेंद्र वाघाये, सुमित शेंद्रे, लिपीक प्रवीण गढे, शिव हुकरे, रोहिदास भिवगडे पथकात होते. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी ५० किलो प्लास्टिक जप्त
नगर परिषदेच्या पथकाने बुधवारी (दि.३) शहरात कारवाई करून चार व्यापाºयांना दणका दिला होता. पथकाने शहरातील जैन कुशल भवन समोरील मनिष ट्रेडर्स, बापूजी व्यायाम शाळा जवळील श्रीराम किराणा स्टोअर्स, सिंधी कॉलनी शंकर चौकातील गुरूकृपा नॉवेल्टी व चांदनी चौकातील डॉन धिरज प्लास्टिक या दुकानांवर कारवाई केली होती. पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एकूण २० हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच, त्यांच्याकडील डिस्पोजल ग्लास, थर्माकोल प्लेट्स, पाणी पाऊच, प्लास्टिक पिशव्या असे एकूण ५० किलो साहित्य जप्त केले होते.