४२४४ चिमुकल्यांची ‘मुस्कान’ फुलली
By admin | Published: June 27, 2016 01:48 AM2016-06-27T01:48:25+5:302016-06-27T01:48:25+5:30
मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या
नरेश रहिले ल्ल गोंदिया
मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. १८ वर्षाखालील बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन ‘मुस्कान’ ही मोहीम राबविली. मागील दोन वेळा राबविलेल्या या मोहिमेत राज्यातील ४ हजार २४४ अपहृत बालकांना शोधून त्यांच्या मात्या-पित्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने राबविलेल्या आॅपरेशन मुस्कान या अभियानाला राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळाल्याने जून महिन्यात पुन्हा चौथे आॅपरेशन मुस्कान अभियान सुरू केले आहे. ६ मुले व १६ मुली अशा २२ बालकांच्या शोधासाठी तिसऱ्या वेळी आॅपरेशन मुस्कान गोंदिया जिल्हा पोलीस राबवित आहेत.
जुलै २०१५, त्यानंतर जानेवारी २०१६, मार्च व आता जून २०१६ मध्ये आॅपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क केला जातो. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थांचीही काही ठिकाणी मदत घेतली जाते. तर गोंदिया जिल्ह्यात समाजसेवी संघटनांची मदती मिळत नाही.
आॅपरेशन मुस्कानला राज्यात उदंड प्रतिसाद मिळाल्याने अपहरण झालेली बालके व हरविलेल्या बालकांना या अभियानाच्या माध्यामतून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
जिल्ह्यात शोधले ३९ बालके
आॅपरेशन मुस्कान प्रकल्पात पोलिसांनी जुलै २०१५ या महिन्यात ३१ बालकांचा शोध लावला होता. त्यानंतर दुसऱ्या मुस्कानमध्ये जानेवारी महिन्यात ६ व तिसऱ्या मुस्कानमध्ये मार्च महिन्यात दोन बालकांना शोधून त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु ६ मुले व १६ मुली अशा २२ बालकांना शोधण्यात आॅपरेशन मुस्कानला यश आले नाही.
सामाजिक संघटना सज्ज व्हा
या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला सर्वांनी तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करणे, आई-वडील नसल्यास बाल कल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलीस करतात. समितीने त्या बालकांना बाल सुधारगृहात पाठविण्यास सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना नेऊन सोडून देतात. त्यानंतर त्या बालकांकडे दुर्लक्ष केले जाते. या बालकांचे शिक्षण व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. परंतु गोंदियातील कोणत्याही सामाजिक संघटना तीन आॅपरेशन मध्ये पुढे आल्या नाही.
आॅपरेशन मुस्कानला बळ
जिल्ह्यात नव्याने रूजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी या आॅपरेशन मुस्कानला अधिक बळ देण्यासाठी जिल्ह्यात ११ पथक तयार करण्यात आले आहेत. त्या पथकात ५० पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा समावेश केला आहे. गोंदिया शहर २ कर्मचारी, गोंदिया ग्रामीण २, रामनगर ३, रावणवाडी ५, तिरोडा ८, आमगाव ३, गोरेगाव ३, सालेकसा ३, डुग्गीपार ४, देवरी ३ व जिल्हास्तरावर एक पथक तयार करून त्यात १ अधिकारी ३ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शासनाने २०१० पासून बेपत्ता बालकांचा शोध घेण्यासाठी आॅपरेशन मुस्कान सुरू केला. गोंदिया जिल्ह्याने ७५५ मुले-मुली बेपत्ता होत्या. त्यातील ७३३ मुला-मुलींना शोधण्यात आले. काही स्वत:हून घरी परतल्या. आता उर्वरित २२ बालकांचा शोध घेऊन १०० टक्के आॅपरेशन पुर्ण करू. त्यासाठी नवप्रविष्ट पोलीस कर्मचाऱ्यांना आॅपरेशन मुस्कान या अभियानात सहभागी करून त्यांच्यासाठी ११ पथके तयार करण्यात आली आहेत.
- डॉ. दिलीप पाटील भुजबळ
पोलीस अधीक्षक, गोंदिया.