जिल्ह्यातील ४२९६ लोकांनी ई-चलान भरलाच नाही ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:27+5:302021-08-25T04:34:27+5:30
नरेश रहिले गोंदिया : वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक अधिनियमाच्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते. जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकारी ...
नरेश रहिले
गोंदिया : वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक अधिनियमाच्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते. जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहनांना अडविण्याची गरजच आता राहिली नाही. सद्य:स्थितीत प्रत्येक वाहतूक पोलिसाच्या हातात ई-चलानसाठी मोबाईल दिला आहे. या मोबाईल ॲपवर संबंधित वाहनाच्या क्रमाकांचे छायाचित्र काढले जाते. हे छायाचित्र काढताच त्या वाहनचालकाच्या मोबाईलवर दंडाचा एसएमएस जातो; परंतु अनेक लोक आपले मोबाईल क्रमांक वारंवार बदलत असल्याने त्यामुळे त्या वाहनचालकाला आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, आपल्याला दंड ठोठावण्यात आला हे देखील माहिती नसते. अशा ४२९६ जणांवर करण्यात आलेला ११ लाख ९० हजार ४०० रुपये दंड अद्याप भरला गेला नाही.
गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी सन २०१९ मध्ये ३१ हजार २४६ लोकांवर ई-चलान केले. त्यांना ८३ लाख २० हजार रुपये दंड करण्यात आला. यापैकी ७६८ लोकांनी ३ लाख ५५ हजार २०० रुपये दंड भरला नाही. सन २०२० मध्ये ३७ हजार २२५ लोकांना ८४ लाख २१ हजार १५० दंड आकारण्यात आला. त्यापैकी २ हजार ९०७ लोकांनी ६ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा दंड भरला नाही. २०२१ जुलैपर्यंत १४ हजार ४४९ लोकांना ई-चलान करण्यात आले. असा ३३ लाख १६ हजार ६५० चलान करण्यात आला; परंतु यापैकी ६२१ लोकांनी १ लाख ४९ हजार ६०० रुपये चलान भरले नाही. अडीच वर्षांतील ई-चलानमुळे ४ हजार २९६ लोकांनी दंड भरला नसून त्याची रक्कम ११ लाख ९० हजार ४०० रुपये आहे.
......................
७८ हजार ६२४ लोकांनी भरला १.८८ कोटी दंड
वाहतूक नियम तोडणाऱ्या ७८ हजार ६२४ लोकांनी मागील अडीच वर्षांत १ कोटी ८८ लाख ६७ हजार ४०० रुपये दंड भरला आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना हा दंड जिल्हा वाहतूक पोलीस करीत असतात. सन २०१९ ते जुलै २०२१ या काळात हा दंड वसूल करण्यात आला आहे.