४.३५ कोटींचे कृषी साहित्य वाटणार
By admin | Published: November 29, 2015 02:32 AM2015-11-29T02:32:57+5:302015-11-29T02:32:57+5:30
शासन शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना राबविते, मात्र लालफितशाहीत योजना अडकून त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी बराच उशिर लागतो.
१,१६९ लाभार्थ्यांची निवड : आर्थिक वर्षात पहिल्यांदाच मिळणार योजनांचा लाभ
देवानंद शहारे गोंदिया
शासन शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना राबविते, मात्र लालफितशाहीत योजना अडकून त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी बराच उशिर लागतो. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविल्या जात असलेल्या कृषी साहित्य वाटप योजनेतून येत आहे. एप्रिल पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात तीन योजनांसाठी निधीच उपलब्ध नसल्यामुळे रखडलेल्या त्या योजना आता मार्गी लागत आहे. त्यासाठी ४.३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तिन्ही योजनांमध्ये कृषी साहित्यांच्या लाभासाठी जिल्ह्यातील १ हजार १६९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून एकूण ४ कोटी ३५ लाख रूपये उपलब्ध झाले. सदर रक्कम जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांना वाटपही करण्यात आली आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या (एससी) एकूण ८९३ शेतकऱ्यांची निवड यात करण्यात आली आहे. यापैकी पहिल्यांदा ५०१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा निवड प्रक्रिया राबवून आणखी ३९२ शेतकऱ्यांना निवडण्यात आले. असे एकूण ८९३ मागास प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी साहित्यांचा लाभ देण्यात येणार आहे.
याशिवाय आदिवासी क्षेत्रांतर्गत (टीएससी) येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी साहित्य देण्यासाठी २०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. आदिवासी क्षेत्रांतर्गत सालेकसा व देवरी हे दोन तालुके मोडत असल्याने तेथीलच शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला. यात सालेकसा तालुक्यातील ८३ व देवरी तालुक्यातील ११७ अशा एकूण २०० शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ७६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तालुक्यांचा समावेश असून गोंदिया तालुक्यातील ९, तिरोडा तालुक्यातील २१ व गोरेगाव तालुक्यातील ४६ अशा एकूण ७६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
सदर लाभार्थ्यांची निवड दोन वर्षांसाठी करण्यात येते. यावर्षी निवड झालेल्या सदर लाभार्थ्यांना मार्च २०१६ पर्यंत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समित्यांना दिवाळीपूर्वीच निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाचे दर करारपत्रक निर्गमित झाले आहे. शेतकऱ्यांनी मागणी केलेली औजारे व आर्थिक मर्यादा ५० हजार रूपये यानुसार चालू आर्थिक वर्षातच निवड झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
शासनाने मंजूर केलेला निधी
शासनाने सदर तिन्ही योजनांसाठी एकूण ४ कोटी ३५ लाख रूपये मंजूर केले असून ते जिल्हा परिषदेमार्फत संबंधित पंचायत समित्यांना वाटपही करण्यात आले आहेत. यात विशेष घटक योजनेंतर्गत (एससी) अनुसूचित जातीसाठी २.८० कोटी रूपये, आदिवासी क्षेत्रांतर्गत (टीएससी) लाभार्थ्यांसाठी १.२५ कोटी रूपये व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत ३० लाख रूपयांचे वाटप संबंधित पंचायत समित्यांना करण्यात आले आहे.
प्रतिलाभार्थी ५० हजारांचे कृषी साहित्य
सध्याच्या चालू आर्थिक वर्षात प्रतिलाभार्थ्यास ५० हजार रूपयांचे कृषी साहित्य देण्यात येणार आहे. या साहित्यांमध्ये बैलजोडी, बैलगाडी, पंप संच, पाईपलाईन, धान उडवणी पंखे, स्प्रे पंप इत्यादी औजारांचा समावेश आहे. त्यासाठी पंचायत समित्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातून पंचायत समित्यांमार्फत कृषी साहित्य खरेदी करून देण्याची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.